संजय बनसोडे आणि सुधाकर भालेराव : तिरू बॅरेजेसचे सत्य जनतेसमोर मांडतील का?

0
578
संजय बनसोडे - सुधाकर भालेराव

महाचर्चा | उदगीर आणि जळकोट तालुक्यात सध्या तिरू बॅरेजेसच्या विषयावर विद्यमान आमदार संजय बनसोडे आणि माजी आमदार सुधाकर भालेराव एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. खरे तर तिरू बॅरेजेस व्हावेत यावर कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थ आणि हरित क्रांती घेऊन येणारा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.

आता या संवेदनशील आणि महत्वाच्या मुद्द्यावर माजी आमदार सुधाकर भालेराव आरोप करीत असतील तर, त्यामध्ये काही तरी तथ्य असलेच पाहिजे. कारण सध्याच्या विपरीत परिस्थतीत सुधाकर भालेराव एवढा संवेदनशील विषय एवढ्या उथळपणे व सवंगपणे हाताळतील असे वाटत नाही. कदाचित त्यांची मांडणी चुकली असेल, किंवा विषय मांडत असताना भावनिक होऊन बोलले असतील. याचा अर्थ आरोप खोटा आहे, असे होऊ शकत नाही.

कारण जळकोट तालुका आणि तिरू नदी त्यांच्यासाठी नक्कीच जिव्हाळ्याचा विषय असू शकतो. त्यांनी केलेला आरोप खोटा आहे, राजकीय आकसापोटी बोलत आहेत असे म्हणून केलेला आरोप गैरलागू ठरवता येत नाही. सुधाकर भालेराव यांच्यासाठी हा विषय राजकीय जीवनाला नव्याने उभारी देणारा आहे. त्यामुळे आरोप व त्याचे गांभीर्य त्यांना नक्कीच माहित असेल. 116 कोटी रुपये ऐकले तरी सामान्य माणसाची छाती दडपून जाते.

तेव्हा एवढा गंभीर आरोप करताना, सवंग लोकप्रियतेच्या मागे जाऊन केलेला आरोप नक्कीच नाही. सुधाकर भालेराव आरोप करताच ज्या वेगाने संजय बनसोडे यांनी तिरू नदीवर जाऊन फोटोसेशन केले, कार्यकर्त्यांना पोस्ट करायला लावल्या, काही कार्यकर्त्यांनी व्हिडीओ अपलोड करायला लावले. याचा अर्थ आरोप बरोबर आहे, आणि नेमका वरमावर लागला आहे. आरोप खोटा होता, तर नक्की दुर्लक्ष केले असते. कारण तेवढे राजकीय शहाणपण संजय बनसोडे यांच्याकडे आहे. तर दुसरीकडे माजी आमदार भालेराव यांच्याकडे आरोपाचे गांभीर्य कळावे एवढा राजकीय अनुभव आहे.

मित्र पक्षातील जेष्ठ आमदारांची थेट खिल्ली उडवून आरोप फेटाळून लावल्याने आरोपाचे गांभीर्य कमी झालेले नाही, उलट वाढलेले आहे. तिरू बॅरेजेसच्या कामात कसलाच भ्रष्टाचार झाला नसेल आणि होते नसेल तर मतदार आणि शेतकऱ्यांचे शंका समाधान करण्याची जबाबदारी संजय बनसोडे यांच्यावरच आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांना खोटे ठरविण्याची खूप मोठी संधी चालून आली आहे. पुढील काळात तिरू बॅरेजेस व इतर कोणत्याही विकास कामावर आरोप होऊ नयेत, आपण भ्रष्टाचार करीत नाही, आपण मिस्टर क्लीन असल्याचे सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे.

जर कार्यकर्त्यांना पुढे करून माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या आरोपाला बगल दिली जात असेल, सोशल मिडीयावर ट्रोल करून गप्प बसविले जात असेल. आरोपाची चौकशी करण्याचे टाळले जात असेल तर नक्कीच तिरू बॅरेजेसचे पाणी भ्रष्टाचाराच्या आरोपात मुरलेले आहे. एकतर माजी आमदार खरे बोलत आहेत, त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे किंवा संजय बनसोडे काही तरी लपवत आहेत. सत्य बाहेर येऊ नये म्हणून विषयाला बगल देत आहेत.

दोघांपैकी एक जण नक्कीच खरे बोलत आणि एकजण खोटे बोलत आहे, आता खरे कोण आणि खोटे कोण बोलत आहे, हे जाणून घेण्याचा हक्क मतदारांना आहे. दोघांनी जनतेसमोर येऊन सत्य मांडावे. माजी आमदार यांनी केलेला आरोप छोटा नाही, 116 कोटी रुपयांचा आरोप फेटाळून लावताना सत्य सांगण्याचे नैतिक बंधन मंत्री संजय बनसोडे यांच्यावर कैक पटीने वाढले आहे. दोघांपैकी कोण मतदाराचे आणि शेतकऱ्यांचे शंका समाधान करते हे पहावे लागेल.

तिरू नदीवर करण्यात येणाऱ्या बॅरेजेसच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा : सुधाकर भालेराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here