Maha News | उद्धव ठाकरे गट – शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला ‘धनुष्यबाण’ देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी बुधवारी पुन्हा तहकूब करण्यात आली. यामुळे ठाकरे गटाची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. शिवसेनेला ठाकरे परत मिळणार की नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीत स्पष्ट होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय पक्षांचे महत्त्व अधोरेखित केले असले तरी आयोगाचा निर्णय त्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरण्याचे अधिकार शिंदे गटाला दिले. त्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
सत्ता संघर्ष याचिकेवर सुनावणी सुरू असताना ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्याची सुनावणी झाली नाही. या याचिकेवरील सुनावणीही आज पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांविरोधात आज सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.