उदगीरात भाजपाची पक्षनेत्यांना वगळून पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. चिंतन बैठक संपली पण त्यातून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे नेत्यांना द्यावी लागणार आहेत. मागील काही वर्षात नेत्यांमधील आपापसात असलेले हेवेदावे उफाळून आले आहेत. जिल्ह्यात ढोबळमानाने चार, तालुक्यात चार गट उघडपणे एकमेकाचा काटा काढण्यात सतत व्यस्त असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांची गटात विभागणी करुन त्यांच्या माथ्यावर भैय्या समर्थक, केंद्रे समर्थक, अप्पा समर्थक, भालेराव समर्थक असे शिक्के मारुन बदनाम केले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता एकमेकांकडे संशयास्पद नजरेने पहात असतो.
लातूर जिल्ह्यातील व उदगीर शहरातील भाजपातील कबिल्याच्या सरदारांनी कार्यकर्त्यांच्या जीवावर संधी मिळेल तेव्हा व संधी असेल तेव्हा शक्य तेवढ्या ताकतीने मनमानी सत्तेच्या जोरावर रग्गड धनसंचय केला आहे. आता कार्यकर्त्यांना वार्यावर सोडून आपापल्या राजवाड्यात आराम करीत आहेत. देवणी व जळकोट नगर पंचायत निवडणूकांत सुपडा साफ झाला. उदगीरची नगर परिषद निवडणूक तोंडावर आहे. भाजपाचे पक्षनेते निवांत आहेत. त्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्ता नेत्यांच्या तोेंडाकडे पहात बसला आहे.
भाजपाच्या पक्षनेत्यांवर कार्यकर्त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे कालच्या चिंतन बैठकीत कार्यकर्ते फक्त नेत्यांना बोलवा मग त्यांच्यापुढे भावना मांडतो असा हट्ट करु लागले. या हुल्लडबाजीमागेही नेत्यांचेच अदृष्य हात होते. जेष्ठ समजले जाणारे अनुभवी प्रदेश कार्यकारणीतले नेते पक्षनेत्यांनाच एकेरी नावाने बोलू लागले. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्त्यांची किती कोंडी केली हे देखील दिसून आले. मंचावरील शिवानंद हैबतपुरे, बाळासाहेब पाटोदे, उदयसिंह ठाकूर यांच्यासारख्या नव्या पिढीसमोर बसणे झोंबले आणि हुल्लडबाजी करुन मान मिळविण्यासाठी भांडू लागले.
खरेतर शहरातील निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भाजपाच्या तालुकाध्यक्षांनी पुढाकार घेवून ही बैठक बोलावली होती. यामागची भावना मांडताना तालुकाध्यांनी सांगितले की फक्त कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेता याव्यात, मनमोकळा संवाद व्हावा ही अपेक्षा आहे. तरीही प्रदेश कार्यकारणीवर व जिल्हा कार्यकारणीवर असलेल्या नेत्यांना बैठक रुचली नाही. मंचावर आसन नसल्याने मनोमन दुखावलेल्या प्रदेश कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणीवर असलेल्या नेत्यांनी खुन्नस काढली. मंचावर बसून फुटकचा सल्ला द्यायला मिळेल, कोणाच्यातरी नावाने बोटे मोडता येतील या हेतूने आलेल्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आणि मनातील खदखद उफाळून बाहेर पडली. नव्या पिढीचे नेतृत्व मान्य नसल्याचे दाखवून दिले.
या विशेष प्रदेश व जिल्हा कार्यकारणीच्या नेत्यांचा वकूब एवढा आहे की शहरातील 20 प्रभागात कोणी ओळख देत नाही आणि हे कोणाला ओळखत नाहीत. प्रदेश भाजपाला स्थानिक कार्यकर्त्यांना कार्यकारणीत प्रतिनिधीत्व दिले तर पक्ष वाढेल असे भाबडी आशा आहे. सर्व मान्यवर प्रदेश व जिल्हा कार्यकारणी सदस्यांचे अफाट काम आहे. लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणूकीपर्यंत यांचे कार्यक्षेत्र फक्त राजेश्वरी हॉटेल आणि परिसरापुरते मर्यादित आहे. प्रदेश कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणीचे मानकरी गावातून थेट राजेश्वरीवर व राजेश्वरीवरुन डायरेक्ट घरापर्यंत पक्षकार्य करीत असतात.
पक्ष असो की समाज कुठेही मागून मान मिळत नाही. त्यासाठी कर्तबगारी लागते. जुन्या जाणत्या अनुभवाचा पक्षाला फायदा होण्याऐवजी बैठकीत राडा केल्याने मनाचा मोठेपणा नाहीतर कोडगेपणा व कोतेपणा दिसून येतो. पक्षाचे खरेच हित पाहणार्या प्रदेश व जिल्हा पदाधिकारी असते तर बैठकीचे आयोजन करणार्यांचे मोठ्यामनाने कौतूक केले असते. मला मंचावर बोलावले नाही, मंचावर बसायला जागा दिली नाही याचे भांडवल केले नसते. राजमुकूटात कोेंबडीचे पंख लावून राजा होता येत नाही, त्यासाठी कामगिरी दमदारच असावी लागते. कालच्या बैठकीच्या मंचावर बसलेल्यांनी स्वखर्चातून बैठक आयोजित केली, त्यासाठी पदरमोड केली होती. पक्षाचे पदाधिकारीच मंचावर होते. त्यामुळे नव्या पिढीकडे पाहून अस्वस्थ होण्याचे कारण काय? याचेही उत्तर मिळणे गरजेचे आहे.
त्यातील शिवानंद हैबतपुरे यांनी काही महिन्यांतच व्यासपीठावर जागा मिळवली, त्यांना जागा का मिळाली? कशामुळे हा मान मिळतोय? पक्ष त्यांनाच का संधी उपलब्ध करुन देत आहे, याचे आत्मचिंतन तथाकथित प्रदेश कार्यकारणी सदस्यांनी जरुर करावे. मंचावर भांडून किंवा मागून जागा मिळेल मात्र कर्तृत्व स्वःतच सिध्द करावे लागते. शिवानंद हैबतपुरे यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. यासाठीचं भाजपाने त्यांना स्विकारले आहे. त्यांनी कर्नाटकच्या सीमावर्ती भागासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपला एकतरी हक्काचा कार्यकर्ता निर्माण केला आहे. शिवतीर्थापासून उदगीरच्या जिल्हा परिषद मैदानापर्यंत आपल्या वकृत्वत्वाची छाप पाडली आहे.
प्रदेश कार्यकारणी व जिल्हा कार्यकारीत जागा अडवून बसलेल्या नेत्यांनी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून थोडे जरी नियोजन केलेे असते तर चित्र वेगळे दिसले असते. प्रत्येक निवडणूकीत सोयीची भुमिका व कायम या बोटाचा थुका त्या बोटावर करण्यात राजकीय जीवन संपले व संपवले आहे. एका नेत्याच्या बाजुला बसायचे आणि दुसर्या नेत्याच्या नावाने बोटे मोडायची असले राजकारण केल्याने अनेकदा संधी हुलकावणी देत असते. सतत कोणाचा तरी द्वेष करणे, पक्षासाठी आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी राजकारण केल्याने राजकारण होतच नाही. त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. कालच्या बैठकीत हुल्लडबाजी केल्याने मोठेपणाची झुल गळून पडली आहे. नव्या पिढीची तरुण मुलं मंचावर बसलेले सहन होत नाही, हेच तुमच्या मनाचा कोतेपणा दाखविण्यासाठी पुरेसे आहे.