तमाम महाराष्ट्र व लातूरकरांकडून समाज माध्यमात गोजमगुंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना अमित देशमुखांकडून साधी दखल देखील नाही.
लातूर : गेल्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षण मध्ये लातूर महानगरपालिकेचा 38 वा क्रमांक येत लातूर महानगरपालिकेला पुरस्कार प्रदान करण्यात आला,तसेच लातूर महानगरपालिकेला जी.एफ.सी थ्री स्टार मानांकन देखील मिळाल्याने दिल्ली येथे गोजमगुंडे यांनी हा पुरस्कार कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत स्वीकारला आणि लागलीच लातूरच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातुन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.
मात्र हा वर्षाव होत असताना व लातूरकरांसाठी हा पुरस्कार गौरवाची बाब असताना लातूरचे पालक अर्थात पालकमंत्री अमित देशमुखांना, जे एरवी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे फोटो, पोस्ट करत असतात, एवढेच नव्हे तर गल्ली बोळातील कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करत असतात,त्यांना लातूरला मिळालेल्या पुरस्काराचे अभिनंदन करावे असे वाटले नाही.
त्यामुळे हा मिळालेला पुरस्कार अमित देशमुखांना खुपला की हा पुरस्कार घेणारे विक्रांत गोजमगुंडे असा प्रश्न आता उपस्थित होत चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे ही महानगरपालिका अमित देशमुख यांच्या ताब्यात आहे असे असताना साधे अभिनंदन अमित देशमुख यांनी न केल्याने विक्रांत गोजमगुंडे यांना श्रेय मिळू नये व त्यांना राजकीय लाभ मिळू नये म्हणूनच अमित देशमुख यांनी सोशल मीडियातुन त्यांचे अभिनंदन केले नाही असा अर्थ काढला तर तो मुळीच चूक होऊ नये.
आणि लागलीच याची चर्चा सुरू झाल्याने 22 नोव्हेंबर रोजी गोजमगुंडे यांचा महापौर पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला मात्र अमित देशमुख यांनी एक दिवस उशिरा 23 नोव्हेंबर रोजी अभिनंदन केले.त्यामुळे पालकमंत्री यांची जवळची यंत्रणा कशी आहे याचा प्रत्यय नक्कीच येईल. कोणी किती जरी नाकारत असले तरी विक्रांत गोजमगुंडे यांना भविष्यात अमित देशमुख यांना आवाहन देणारा नेता म्हणून पाहिले जाते.तसे अमित देशमुख यांच्या डोक्यात व्यवस्थित फीडिंग करण्यात आले आहे.2019 ला लातूर मनपात सत्तांतर झाले व काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौर झाले.
आज काँग्रेस व काँग्रेस नेते कितीही दावा करत असले तरी काँग्रेसचे उमेदवार हे गोजमगुंडे नव्हतेच हे त्रिकाल सत्य आहे. मात्र सभागृहात अशी कांही गणिते पडली की नाईलाजाने काँग्रेसला गोजमगुंडे यांना पाठिंबा दयावा लागला व कमी पडणारी मते गोजमगुंडे यांनी भाजप फोडत घेतल्याने गोजमगुंडे महापौर झाले.
पूर्वीच अमित देशमुखांना आवाहन देणारे अशी प्रतिमा तयार झाल्याने व त्यातच स्वबळावर गोजमगुंडे महापौर झाल्याने जेवढे दाबता येईल तेवढे दाबत कोणत्याही कामाचे श्रेय गोजमगुंडे यांना मिळता कामा नये याची आजपर्यंत पुरेपूर खबरदारी घेतली गेली.
एवढेच नव्हे तर राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून म्हणजेच मागील दोन वर्षात लातूर महानगरपालिकेला नैसर्गिक निधी वगळता एक नवीन रुपया नाही. उलट मनपाचा निधी पळविला जातो आहे हे भीषण वास्तव आहे.पदावरून तर पायउतार करता येत नाही आणि गोजमगुंडे काही पद सोडणार नाहीत,त्यामुळे ही दाबण्याची व राजकीय श्रेय व फायदा मिळू नये ही नीती आजपर्यंत गोजमगुंडे यांच्याबाबतीत अवलंबली गेली, आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा आला.
20 नोव्हेंबर रोजी लातूर महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये 38 वा क्रमांक देशात आल्याने दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यात गोजमगुंडे यांनी तो पुरस्कार साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या उपस्थित स्वीकारल्याने फक्त लातूरच नव्हे तर संबंध राज्यातून गोजमगुंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला,अनेक प्रसिद्ध फेसबुक पेजवरून गोजमगुंडे यांचे अभिनंदन करत असा महापौर होणे नाही,एक तो दिल है विक्रांतजी, कितने बार जितोगे, विक्रांत है तो मुमकीन है अशी स्तुतीसुमने उधळण्यात आली.
मात्र लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मात्र स्वतःच्या अधिकृत फेसबुक व ट्विटर वर मात्र साधी अभिनंदनाच्या दोन ओळी न टाकल्याने हा पुरस्कार अमित देशमुख यांना खुपला की हा पुरस्कार घेणारे विक्रांत असा प्रश्न सहज उपस्थित होऊ लागला व हे न करण्यामागे पालकमंत्री अमित देशमुख यांचा राजकीय हेतू होता हे काही लपून राहिलेले नाही, लातूरकर हाच अर्थ काढत आहेत.
यातून खरंच विक्रांत गोजमगुंडे यांना अमित देशमुख हे पुढील काळातील प्रभावी आवाहन मानतात हे स्पष्ट झाले.अमित देशमुख यांनी अभिनंदन न केल्याने शहरात चर्चा सूरु झाली, भुरट्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास वेळ आहे, गल्ली बोळात झालेल्या कार्यक्रमाचे फोटो टाकण्यास वेळ आहे, मात्र जी महानगरपालिका अमित देशमुख यांच्या ताब्यात आहे त्या लातूरचा गौरव दिल्लीत झालेला असताना त्यांच्या दोन ओळी अभिनंदनाच्या टाकण्यास वेळ नाही का अशी कुजबुज सुरू झाली.
हा पुरस्कार 20 नोव्हेंबर रोजी मिळाला आणि 22 नोव्हेंबर रोजी विक्रांत गोजमगुंडे यांच्या महापौर पदाला दोन वर्षे पूर्ण झाली,पहिलेच पुरस्कार मिळाला आणि लागलीच दोन वर्ष पूर्ण झाल्याने गोजमगुंडे पुन्हा चर्चेत आले, त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी नाईलाजाने एक दिवस उशिरा म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत फेसबुकवरून दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल विक्रांत गोजमगुंडे यांचे अभिनंदन केले आणि लागलीच विक्रांत गोजमगुंडे यांनी देखील अमित देशमुख यांच्यामुळे मला महापौर होता आले, मला पुरस्कार स्वीकारता आला अशी स्तुतीसुमने उधळली.
मात्र ज्या पालकमंत्र्यांना मनपाला पुरस्कार भेटल्याचे कौतुक नाही,ज्यांनी तुम्हाला पदावर बसविले नाही त्यांची कधीपर्यंत आणि कुठपर्यंत खोटी स्तुती करायची हे देखील गोजमगुंडे यांनी ठरवण्याची गरज आहे.
महापौर,दिल्ली आणि राजीनामा ! महापौर पदावर असताना दिल्लीपर्यंत जाणारे विक्रांत गोजमगुंडे हे दुसरे महापौर आहेत.
यापूर्वी अख्तर मिस्त्री हे लातूरचा पाणी प्रश्न घेऊन थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटले होते,आणि तेच मिस्त्री यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण ठरले होते.अर्थात मिस्त्री यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटून शैलेश पाटील चाकूरकर यांना सोबत घेऊन ही भेट घेतल्याने मिस्त्री आपल्या हद्दीच्या बाहेर जात आहेत असा अंदाज येताच मिस्त्री यांचा व्हाया जात प्रमाणपत्र करेक्ट कार्यक्रम करण्यात आला व मिस्त्री यांना ठरवून जात प्रमाणपत्र प्रकरणात गोवण्यात आले, असा जाहीर आरोप मिस्त्री यांनीच केला आहे.
त्यामुळे दिल्ली ही महापौर पदाला आपिशी आहे का? असा सवाल उपस्थित झाला तर नवल वाटू नये.कारण गोजमगुंडे यांनी दिल्लीला जाऊन त्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात देखील आपली छाप टाकल्याने व त्यांचे कौतुक संपूर्ण जिल्हा भरातून झाल्याने ही गोष्ट अमित देशमुखांना नक्कीच खटकली असणार यात शंका असण्याचे मुळींच कारण नाही,त्यामुळे दिल्ली गोजमगुंडे यांना फायद्याची ठरते की घातक हे येणारा काळच ठरवेल.
अर्थात सहजासहजी गोजमगुंडे आपले पद सोडतील म्हणणे देखील धाडसाचे ठरेल,कारण हे पद जरी काँग्रेस कितीही छाती ठोकून आम्ही दिले आहे असे सांगत असले तरी हे पद गोजमगुंडे यांनी स्वतःच्या बळावर मिळवले आहे हे त्रिकाल सत्य आहे.आता यातून देखील त्यांना डिस्टर्ब केले जाणार व मिस्त्री यांच्याप्रमाणेच त्यांचा देखील कार्यक्रम केला जाणार का याचे उत्तर येत्या काळात मिळेलच. – सौजन्य : बातमी मागची बातमी