बसवराज पाटलानंतर शरण पाटलांचा राजकीय गेम ?

0
2213

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत 2014 प्रायमरीज व 2019 च्या पुनरावृत्तीची चाहूल

येत्या 12 डिसेंबरला काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष पर्यंत निवडणुका होत असून प्रदेशाध्यक्ष पदासाठी मराठवाड्यातुन माजी मंत्री बसवराज पाटील यांचे सुपुत्र शरण पाटील हे या निवडणुकीसाठी उभे असल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे लातूरहून रणनीती आखून, रसद पुरवून बसवराज पाटील यांचा पराभव करत राजकीय गेम करण्यात आला, तसाच गेम शरण पाटील यांचा करण्याची पेरणी केली जात असल्याची माहिती मिळते आहे.

त्यामुळे या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत 2019 च्या औसा विधानसभेची व 2014 च्या प्रायमरीज निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची चाहूल लागली असल्याची एकंदरीत परिस्थिती पाहता दिसते आहे.

2014 ला काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी प्रायमरीज निवडणूक घेण्यात आली होती,ज्यात लोकसभा निवडणुकीत पराभव होणाऱ्या दत्तात्रय बनसोडे यांना मतदान करा असे फर्मान लातूरच्या काँग्रेस नेत्याकडून देण्यात आले होते.

अर्थात हा खुलासा या निवडणुकीत उभे असलेले व पराभूत झालेले मोहन माने यांनी केला होता, त्यामुळे तशीच पुनरावृत्ती युवक काँग्रेस निवडणुकीत होत शरण पाटलांना मतदान करू नका, नागपूरला अर्थात मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांना किंवा अन्य उमेदवाराला करा असे फर्मान काढत शरण पाटील यांचा राजकीय गेम करत बसवराज पाटील यांना दुसरा धक्का देण्याची तयारी सध्या सुरू आहे असेच एकंदरीत बैठका, कुजबुज, अनेकांना दिलेले फर्मान पाहता स्पष्ट होते आहे.

काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत युवक काँग्रेसच्या निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.शहराध्यक्ष पासून प्रदेशाध्यक्ष पदासाठी युवक काँग्रेसचे सभासद मतदान करत असतात.सदस्य नोंदणी व मतदान याचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर असा आहे.त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रदेशाध्यक्ष पदासाठी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत, मुंबई येथील अनिकेत म्हात्रे, कराड येथील शिवराज मोरे व मराठवाड्यातुन माजी आमदार बसवराज पाटील यांचे सुपुत्र शरण पाटील हे मुख्य दावेदार आहेत.

ज्याला सर्वाधिक मते तो प्रदेशाध्यक्ष व नंतर पराभूत झालेले उपाध्यक्ष, सरचिटणीस अशी एकंदरीत पद्धत आहे.मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशमुख- पाटील असा काँग्रेस अंतर्गत सामना पाहवयास मिळणार आहे.त्यामुळे बसवराज पाटील यांना शह देण्यासाठी शरण पाटील यांना मतदान न करता विदर्भातील कुणाल राऊत यांना मतदान करा असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना आले तर नवल वाटायला नको.

अर्थात यामागे जिल्हयात काँग्रेसचे सत्तेचे दुसरे केंद्र नको हाच उद्देश आहे. 2019 ला जो पराभव बसवराज पाटील यांचा केला गेला, त्याचे देखील कारण तेच होते.

कारण सत्ता आल्यावर जेष्ठता पाहता मंत्रिमंडळात बसवराज पाटील यांचाच नंबर लागला असता हे काही वेगळे सांगायला नको व हे हेरूनच लातूरच्या देशमुखांनी भाजपचा उमेदवार ठरवण्यापासून ते त्याला निवडून आणण्यापर्यंत अनेक खेळया केल्या.

2014 ला असाच प्रकार घडला होता.म्हणजे काँग्रेस पक्षात पदासाठी निवडणुका या दोन ठिकाणी होतात एक युवक काँग्रेसमध्ये व दुसरा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी प्रायमरीज मध्ये.2014 ला काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले.

ज्यात दत्तात्रय बनसोडे, मोहन माने, जयंत काथवटे, भाई नगराळे, सौ.सुनीता आरळीकर असे मुख्य दावेदार होते.या निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, युवक काँग्रेसचे व काँग्रेसचे पदाधिकारी व इतर पदाधिकरी यांनी मतदान करायचे होते.

त्यावेळी सर्वांनी दत्तात्रय बनसोडे यांना मतदान करा असे आदेश लातूरच्या काँग्रेस नेत्यांनी म्हणजे देशमुखांनी दिले व परिणामी बनसोडे प्रायमरीजमध्ये निवडून आले व लोकसभेला पडले.

अर्थात देशमुखांना लातूरची जागा निवडून आणायची होती का हा प्रश्न अनुत्तरित आहेच आणि त्यासाठीच कच्चा उमेदवार दिला गेला. अन्यथा स्थानिक व प्रबळ उमेदवार दिला असता तर चित्र नक्कीच वेगळे असते.

मात्र हेच कदाचित नको होते म्हणूनच 2014 असेल किंवा 2019 लोकसभेला भाजपचा खासदार निवडून आला. तीच 2014 ची प्रायमरीजची आणि 2019 ची औसा विधानसभेची एकत्र पुनरावृत्ती या युवक काँग्रेसच्या निवडणुकीत होण्याची चाहूल सध्या लागत आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटील यांच्या पराभवासाठी लातूरहुन सर्व अर्थाने रसद पुरवली गेली हे काही आता लपून राहिलेले नाही.त्यामुळे जसे 2014 ला प्रायमरीज निवडणुकीत ठरवून पदाधिकाऱ्यांना एक विशिष्ट व्यक्तीला मतदान करण्यास लावले तसेच या निवडणुकीत होत शरण पाटील यांच्याऐवजी दुसऱ्या कोणालाही मतदान करण्याचे फर्मान निघाले आणि जसे 2019 ला बसवराज पाटील यांचा राजकीय गेम केला तसाच शरण पाटील यांचा केला तरी तर नवल वाटायला नको.

कारण प्रदेशाध्यक्ष हे पद नक्कीच लहान नाही आणि बसवराज पाटील सध्या काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत, बसवराज पाटील कार्याध्यक्ष आणि शरण पाटील हे युवकांचे प्रदेशाध्यक्ष हे नक्कीच लातूरचे देशमुख सहजासहजी स्वीकारतील असे मुळीच नाही आणि त्यामुळे शरण पाटील यांच्या पराभवासाठी आवश्यक सर्व खेळया केल्या जाणार यात काही शंका नाही.

सध्या बैठका पाहता व एकंदरीत कल पाहता तशीच कांहीशी चाहूल लागते आहे, त्यामुळे 2019 ला गाफील राहिलेले बसवराज पाटील पुत्राच्या विजयासाठी काय रणनीती आखतात हे येणारा काळच ठरवेल.मात्र पाटलांचा राजकीय गेम करण्यासाठी खेळी खेळली जाणार हे मात्र नक्की.

● साभार : बातमी मागची बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here