लातूर : उदगीर तालुक्यातील जळकोट वाहणाऱ्या तिरू नदीवर चालू असलेल्या बॅरेजस दुरुस्तीच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा चालू असल्याचा आरोप उदगीर विधानसभेचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे उदगीरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. महायुतीत असणाऱ्या भाजपाच्या माजी आमदारांनी केलेल्या आरोपामुळे विद्यमान आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तिरू नदीवर चालू असलेल्या बॅरेजसच्या प्रकरणावर आजी व माजी आमदार आमने सामने आले आहेत.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आरोप केला आहे की, बॅरेजसच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहे, नवीन एक बॅरेज तयार करण्यासाठी जो खर्च येऊ शकतो, मात्र दुरुस्तीच्या नावावर तिप्पट खर्च करून कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला जात आहे. या नदीवर किलो मीटरवर एक बॅरेजेस तयार केले असते तर तालुक्यात सर्वत्र पाणी थांबून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले असते. शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आले असते परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये लाटण्याचा प्रकार सध्या चालू आहे.
मागील चार वर्षापासून उदगीर व जळकोट तालुक्यात अनेक विकासाची कामे माझ्यामुळे आली व उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची भीष्म प्रतिज्ञा करणारे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यावर युती मधील घटक पक्ष असलेल्या भाजपाच्या माजी आमदारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यपद्धती सोबतच होणाऱ्या भ्रष्टाचाराची देखील चर्चा रंगली आहे.
मंत्री संजय बनसोडे यांनी माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. सर्व आरोप खोटे असून बॅरेजसचे काम योग्य आणि दर्जेदार होत आहे, बॅरेजस शेतकऱ्यांच्या विकासाचे माध्यम आहेत. खोटे आरोप करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे, बनसोडे यांनी म्हटले आहे.