गोजमगुंडे- लाहोटी एकत्र आले तर 1991 च्या प्रयोगाची यशस्वी पुनरावृत्ती ?

0
1095
  • 91 ला विलासराव देशमुखांनी पक्षात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बंडखोरी करत केला होता तिसऱ्या आघाडीचा प्रयोग.

  • भावी राजकीय वाटचालीसाठी गोजमगुंडे- लाहोटी यांना आपले अस्तित्व सिद्ध करण्याची गरज!

लातूर : मनपा निवडणूक तोंडावर असल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत,मात्र राजकीय पक्षापेक्षा एक नवीन पर्याय अर्थात तिसरी आघाडी शहरात निर्माण करण्याची आज गरज आहे आणि ती गरज भाजपचे लाहोटी व काँग्रेसचे गोजमगुंडे एकत्र आले तर पूर्णत्वास जाऊ शकते व 1991 ची पुनरावृत्ती होऊ शकते हे वास्तव आहे.

फक्त गरज आहे ती या दोन्ही नेत्यांनी राजकीय धाडस करत आपले अस्तित्व दाखवण्याची.1991 ला आपले अस्तित्व काँग्रेसमध्ये सिद्ध करण्यासाठी पालकमंत्री असताना विलासराव देशमुख यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी केली होती व जवळपास 7 नगरसेवक निवडून आणले होते व नगराध्यक्ष देखील विलासराव देशमुखांनी राजीव मंच या तिसऱ्या आघाडीचा केला होता, हा इतिहास आहे.

आज भाजपात लाहोटी असतील किंवा काँग्रेसमध्ये गोजमगुंडे असतील यांना वारंवार दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न कायम सुरू असतो. त्यामुळे जर राजकीयदृष्ट्या या दोन्ही उभय नेत्यांना जिवंत राहायचे असेल तर तिसरी आघाडी करत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची व 91 च्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याची संधी येत्या मनपा निवडणुकीच्या निमित्ताने आहे.

2019 ला जे सत्तांतर मनपात होऊन काँग्रेसचे गोजमगुंडे महापौर झाले त्यात लाहोटी यांची भूमिका महत्त्वाची होती हे विसरून चालणार नाही.

लातूरमध्ये पर्याय नाही,काय करावे असे कायम बोलले जाते. ज्यांना सध्या जनतेने स्वीकारले आहे त्यांना फार मनातून स्वीकारले आहे असे मुळींच नाही.

जनतेच्या मनात नक्कीच रोष आहे. फक्त सक्षम पर्याय नाही म्हणून लातूरची जनता फरफटत जाते आहे हा इतिहास व वर्तमान आहे व भविष्य देखील हेच ठेवायचे नसेल तर गोजमगुंडे- लाहोटी यांना एकत्र येत नेतृत्व करण्याची आज घडीला काळाची गरज आहे.

लातूर मनपात प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची व्होटबँक ही पूर्वभाग आहे तर भाजपची पश्चिम भाग. मागील वेळी पूर्व भागामुळे काँग्रेसची नाक राहिली व 20 पैकी 19 नगरसेवक या पूर्व भागातून काँग्रेसचे आले. 2022 ला परिस्थिती वेगळी असणार आहे. काँग्रेसच्या बरोबरीने पूर्व भागात राष्ट्रवादीचा मोठा जनाधार आहे.

2012 ला जे 13 नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले होते त्यापैकी बहुतेक नगरसेवक या पूर्व भागातूनच होते व सध्या राष्ट्रवादीची तयारी पाहता पूर्व भागात यंदा जोर लावला जाणार हे काही वेगळे सांगायला नको.

त्यातच वंचित, एम आय.एम हे देखील या पूर्व भागात जोर लावणार असल्याने या सर्वांचा फटका कॉंग्रेसलाच बसणार हे सांगायला कोणत्या भविष्यकाराची गरज आहे असे मुळीच नाही.

त्यातल्या त्यात पूर्व भाग व गाव भाग याठिकाणी गोजमगुंडे- लाहोटी यांना मानणारा मोठा वर्ग आहे,त्यामुळे तिसरी आघाडी करत या दोन्ही उभय नेत्यांनी नेतृत्व केले तर 2022 ला हे दोन्ही नेते एक वेगळा पर्याय देऊ शकतात व नक्कीच कींगमेकर ठरू शकतात हे वास्तव आहे.

2017 ला मनपात जे ऐतेहसिक सत्तांतर झाले व भाजपची सत्ता आली त्यात सर्वात मोठा म्हणण्यापेक्षा सिंहाचा वाटा लाहोटी यांचाच होता. एवढेच नव्हे तर 2019 ला बहुमत नसताना जो काँग्रेसचा महापौर बसला त्यात देखील भाजपच्या लाहोटी यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे.

आज काँग्रेसमध्ये गोजमगुंडे असतील किंवा भाजपमध्ये लाहोटी असतील या दोघांना कायम दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न सुरूच असतो.

लाहोटी यांना तर 2019 ला भाजपनेच ठरवून पाडले अशीच कांहीशी परिस्थिती. तर गोजमगुंडे जरी आज महापौर असले तरी त्यांना कोणत्याच गोष्टीचे श्रेय मिळू नये.

त्यांच्या काळात विशेष काम होऊ नये याची उत्तम खबरदारी घेतली जाते. अर्थात त्याला विधानसभेची किनार आहे हे काही वेगळे सांगायला नको. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना क्षमता असताना राजकारणाचा बळी व्हावा लागत आहे.

त्यामुळे आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जो प्रयोग विलासराव देशमुख यांनी तिसऱ्या आघाडीचा केला होता तसाच प्रयोग गोजमगुंडे- लाहोटी यांना करण्याची नामी संधी 2022 च्या मनपा निवडणुकीच्या निमित्ताने आहे.

1991 ला फार मोठ्या संख्येने राजीव मंचचे नगरसेवक निवडून आले होते असे नाही जवळपास 7 नगरसेवक निवडून आले होते व काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार न दिल्याने राजीव मंचचे एस.आर देशमुख नगराध्यक्ष झाले होते.

त्यामुळे किमान कींगमेकर होता येईल तेवढे नगरसेवक सहज गोजमगुंडे- लाहोटी हे निवडून आणू शकतात हे वास्तव आहे व गोजमगुंडे- लाहोटी यांची व काळाची गरज देखील.

कारण लाहोटी यांना 2014 व 2019 ला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे लाहोटी पुन्हा निवडणूक लढवतील अशी सुतराम शक्यता नाही तर कॉंग्रेसमुळे नव्हे तर स्वतःच्या राजकीय बळावर महापौर झालेले विक्रांत गोजमगुंडे यांना हे पद गेल्यावर कांही दिले जाईल असे मुळीच नाही. फार फार तर नगरसेवक म्हणून रहावे लागेल.

त्यापेक्षा या दोन्ही नेत्यांनी जर नेतृत्व केले तर अनेकांना एक व्यासपीठ मिळणार आहे,परिणामी अनेकजण जुळतील व एक सक्षम पर्याय लातूरच्या जनतेला मिळेल यात कांही शंका नाही, गरज आहे ती राजकीय धाडसाची.

विलासरावांनी 91 ला केलेली बंडखोरी नव्हती तर मग तोच निकष आज देखील लागेल ना.
1991 ला नगर परिषद निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री विलासराव देशमुख यांच्या समर्थकांच्या उमेदवाऱ्या शिवराज पाटील चाकूरकर गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले संभाजी पाटील यांनी कापल्या. पालकमंत्र्यापेक्षा जिल्हाध्यक्ष मोठा असतो असे त्यावेळी उघड बोलले जायचे.

परिणामी विलासराव देशमुख यांनी कॉंग्रेसविरोधात बंडखोरी करत राजीव मंचची स्थापना केली व घड्याळ या चिन्हावर 7 नगरसेवक निवडून आणले. मात्र त्यावेळी ना त्यांनी पालकमंत्री पद सोडले ना पक्षाने त्यांच्यावर कोणती कारवाई केली.

91 ला नुकतेच पालकमंत्री झालेल्या विलासरावांनी 95 पर्यंत आपल्या मंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला, मग असे असताना आज जर कोणी पदावर असून त्याच इतिहासाची पुनरावृत्ती त्याच उद्देशाने केली तर ती बंडखोरी ठरूच शकत नाही.

कारण आज अशी मानसिकता तयार झाली आहे की, कोण जर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू पाहत असेल तर लागलीच त्याच्यावर बंडखोरीचा शिक्का आपोआप बसतो.

मात्र बंडखोरीचा काळाकुट्ट इतिहास हा शिक्का लावण्याच्या अगोदर साफ विसरला जातो, मग 91 ला विलासराव देशमुख यांनी केलेली बंडखोरी नव्हती तर आता देखील ती बंडखोरी ठरू शकत नाही याचा देखील विचार होण्याची गरज आहे.

सौजन्य : बातमी मागची बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here