उपमहापौराना अमित देशमुखांचे काँग्रेस प्रवेशाचे आवतन आणखीन एक लिंगायताची राजकीय माती करण्यासाठी ?

0
1225
उपमहापौराना अमित देशमुखांचे काँग्रेस प्रवेशाचे आवतन आणखीन एक लिंगायताची राजकीय माती करण्यासाठी ?

राजकीय आत्महत्या करण्यापूर्वी चंद्रकांत बिराजदार यांनी इतिहास खंगाळण्याची गरज.

मनपा 2017 च्या निवडणुकीत तुम्हालाच काँग्रेसकडून प्रभाग 17 मधून उमेदवारी होती मात्र दीपक सूळ यांच्यामुळे तुमची उमेदवारी कटली असे सांगत पुढील मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आमच्याकडे अर्थात काँग्रेसमध्ये यावे असे जाहीर आमंत्रण जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी गेल्या आठवड्यात एका जाहीर कार्यक्रमात सध्या कोणत्याच पक्षात नसलेल्या चंद्रकांत बिराजदार यांना दिले.

मात्र असे असले तरी पूर्वीचा अनुभव पाहता चंद्रकांत बिराजदार यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांचे आहे ते अस्तित्व संपवून त्यांची राजकीय माती करत आणखीन एक लिंगायत संपवण्याची ही अमित देशमुख यांची खेळी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

पूर्वीचा अनुभव व इतिहास पाहता बिराजदार यांनी कॉंग्रेस प्रवेश केला तर ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल व ही करण्यापूर्वी जे लिंगायत नेतृत्व काँग्रेसने अर्थात शहरात काँग्रेस म्हणजे देशमुख यांनी पद्धतशीर संपविल्याचा काळाकुट्ट इतिहास आहे तो खंगाळण्याची नित्तांत गरज उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांना आहे म्हंटले तर मुळींच चूक होऊ नये.

त्यामुळे अमित देशमुख जरी बिराजदार यांना किती दिवस गॅसवर राहणार असे सांगत असले तरी बिराजदार यांनी इतरांना गॅसवर ठेवणे व योग्यवेळी योग्य निर्णय घेणे हे बिराजदार यांच्या राजकीय वाटचालीसाठी अधिक चांगले ठरणार आहे.अन्यथा जी नावे इतिहास जमा झालीत त्यात बिराजदार यांचे नाव देखील पुढील काळात जोडले गेले तर नवल वाटायला नको.

उपमहापौर चंद्रकांत बिराजदार हे लिंगायत समाजातून येतात,व आज शहराचे राजकारण पाहिले तर काँग्रेसमध्ये मुख्य प्रवाहात प्रभावी लिंगायात चेहरा नसल्याने शहरातील लिंगायत समाजाची संख्या पाहता, येत्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिराजदार यांना काँग्रेसमध्ये घेत त्यांना पुढे करण्याची व आम्ही लिंगायत समाजाला उपमहापौरपद दिले अशी खेळी बहुधा अमित देशमुख सध्या खेळण्याच्या विचारात आहेत.

जेव्हा की बिराजदार हे स्वतःच्या बळावर उपमहापौर झालेत, एवढेच नव्हे तर बिराजदार यांच्यामुळे काँग्रेसचे गोजमगुंडे महापौर झालेत हे विसरता येणार नाही, आता गोजमगुंडे यांना काँग्रेसचे मानले जाते की नाही हा भाग वेगळा.त्यामुळे निवडणूक झाली की म्हणजे काम झाले की बिराजदार यांना पद्धतशीरपणे बाजूला केले जाईल हे काही वेगळे सांगायला नको.

हा अमित देशमुख यांच्या व्यावसायिक राजकारणाचा एक व्यापक भाग आहे.म्हणजे इतिहासाचा अभ्यास केला तर हाच निष्कर्ष निघतो.म्हणजे पूर्वीच्या नगर परिषदेचे व आत्ताच्या महानगरपालिकेचे राजकारण पाहिले तर लिंगायत समाजातून येणारे मन्मथ लोखंडे,चंद्रकांत चौंडा,दत्ता लोखंडे,राजा राचट्टे, गिरीश ब्याळे, अभिजीत चौंडा, लक्ष्मीकांत मंठाळे, दगडुअप्पा मिटकरी व 2017 पर्यंतचे ताजे उदाहरण म्हणजे स्मिता खानापुरे.हे आज कोठे आहेत याचा अभ्यास उपमहापौर बिराजदार यांना करणे गरजेचे आहे.

यापैकी चंद्रकांत चौंडा, दत्ता लोखंडे, राजा राचट्टे व गिरीश ब्याळे, लक्ष्मीकांत मंठाळे हे अभ्यासू व प्रभावी होते. तसेच समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांचे आज कोठे नाव सुद्धा दिसत नाही. त्यांना प्रवाहात आणण्याचा,संधी देण्याचा तर विषयच नाही.या सर्वांचा गरज पडली की पद्धतशीर वापर केला गेला व नंतर त्यांना पद्धतशीरपणे,सोयीस्करपणे बाजूला केले गेले.

एवढेच काय पक्ष संघटनेत देखील विश्वनाथ कापसे, बी.व्ही मोतीपवळे, संभाजीराव पाटील अशी दिग्गज नावे पद्धतशीर बाजूला केलेली व प्रवाहाच्या बाहेर टाकलेली अनेक नावे घेता येतील. मनपा,विधानसभा नीवडणूक आली की व्यासपीठावर लिंगायत चेहरा दाखवण्यासाठी पाहिजे यासाठीच मोतीपवळे यांचा वापर केला गेला.

आता देखील 2022 च्या मनपा निवडणुकीसाठी बिराजदार यांच्याभोवती गोंडा घोळला जातो आहे हे अगदी उघड आहे. 2017 मध्ये काँग्रेसने 6 लिंगायात समाजातील उमेदवारांना संधी दिली पैकी एकच निवडून आणला,एवढे कशाला बिराजदार ज्या प्रभाग 17 मधून येतात. त्याच प्रभागात माजी महापौर स्मिता खानापुरे यांना येण्यास भाग पाडत त्यांचा पराभव कसा झाला याचे सर्वात मोठे साक्षिदार कदाचित चंद्रकांत बिराजदारच असावेत.

हा एवढा काळाकुट्ट इतिहास नक्कीच न विसरण्यासारखा आहे. हे फक्त महानगरपालिका व पक्ष संघटना यापुरतेच आहे असे नाही. सहकार क्षेत्रात देखील फार काही वेगळे चित्र आहे असे मुळीच नाही. एकंदरीत या सर्वांचा सारांश काढला तर प्रभावी व स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असलेले त्यातल्या त्यात लिंगायात, मुस्लिम व दलित समाजातील चेहरे लातूरच्या काँग्रेसला अर्थात काँग्रेसची मालकी असलेल्या देशमुखांना कधीही पटलेले नाही.

त्यामुळे त्यांना देशमुखांनी कधीही स्वीकारलेले नाही.होईल तेवढे दाबण्याचा व संपवण्याचा प्रयत्न केला आहे.व त्यात त्यांना यश देखील आले आहे. त्यातल्या त्यात स्वबळावर नगरसेवक होऊन स्वबळावर उपमहापौर झालेले बिराजदार देशमुखांना कसे परवडणार आहेत हे बिराजदार यांना कळणे आवश्यक आहे.

गोजमगुंडे यांच्या ऐवजी बिराजदार यांनी इतर कोणाला पाठिंबा दिला असता तर आज चित्र नक्कीच वेगळे असते.या सर्व मागे घडलेल्या घटना विसरून अमित देशमुख पुढील राजकारण करतील, बिराजदार यांना स्वीकारतील व त्यांना मुख्य प्रवाहात आणतील एवढे ब्रॉड माइंडेड राजकारण त्यांचे नक्कीच नाही.

याऊलट गोजमगुंडे यांना दिलेला पाठिंबा आज देखील देशमुखांच्या नजरेत खुपत असणार हे काही वेगळे सांगायला नको.मग असे असताना त्याच चंद्रकांत बिराजदार यांना देशमुख स्वीकारून पुढे आणतील मुळात ही कल्पनाच करणे चुकीचे आहे.कांही दिवसांवर मनपा निवडणूक आहे म्हणून बिराजदार यांना सोबत घेण्याची खेळी अमित देशमुख यांची आहे हे उघड आहे व निवडणूक झाली की जे आजपर्यंतच्या प्रभावी व स्वतःचे अस्तित्व असलेल्या चेहऱ्यासोबत झालंय तेच पद्धतशीरपणे केले जाणार हे सांगण्यास कोण्या भविष्यकाराची गरज आहे असे मुळीच नाही.

आज अमित देशमुख यांची गरज आहे, कारण 2017 च्या मनपा निवडणुकीत शहरातील औसा रोड या पट्ट्यात काँग्रेसचे अस्तित्व जवळपास संपले होते. जी काही नाक राहिली होती ती पूर्व भागामुळे. आता 2022 ला जर परत सत्तेत यायचे असेल तर या भागात काँग्रेसचे संख्याबळ लागणार आहे व त्यासाठी बिराजदार यांच्यासारखी मंडळी सोबत असणे आवश्यक असणार आहे हे न समजण्याइतके अमित देशमुख नक्कीच दुधखुळे नाहीत.

त्यामुळे बिराजदार यांना हा सर्व काँग्रेसमध्ये घेण्याचा खटाटोप हा बिराजदार यांच्या भल्यासाठी नव्हे तर देशमुखांच्या स्वार्थासाठी आहे, हे मुळात बिराजदार यांना समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे पालकमंत्री यांनी दोन शब्द स्तुती केली म्हणून,गोड बोलले म्हणून किंवा तुम्ही किती महत्त्वाचे आहेत हा देखावा करण्याचा प्रयत्न केला म्हणून भावनेच्या भरात वाहून जाण्याची मुळीच गरज बिराजदार यांना नाही.

राजकारणात निर्णय हे भावनेवर नव्हे तर वास्तविकतेवर घेण्याची आवश्यकता असते व ती आज बिराजदार यांना आहे. याउपर त्यांनी समोर धडधडीत आपली माती होणार आहे हे दिसत असताना काँग्रेस प्रवेश केला तर ही त्यांची राजकीय आत्महत्याच असणार आहे व जी लिंगायत चेहरे कालबाह्य झाली त्यात त्यांचे नाव देखील जोडले जाईल हे काही वेगळे सांगायला नको.

याउलट राजकीय फायदा नाही झाला तरी चालेल मात्र आपले अस्तित्व कायम व जिवंत ज्याठिकाणी राहील अश्या पर्यायाचा विचार त्यांनी करण्याची आवश्यकता आहे.

काँग्रेसला पाठिंबा देऊन बिराजदार यांच्या पदरात पडले काय ?

दरम्यान 2019 मध्ये महापौर निवडणुकीत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना चंद्रकांत बिराजदार यांनी विक्रांत गोजमगुंडे यांना समर्थन दिले व गोजमगुंडे महापौर झाले,आता गोजमगुंडे यांना काँग्रेसला महापौर करायचे होते की नाही तो भाग वेगळा,मात्र शहराच्या विकासाच्या दृष्टीने बिराजदार यांनी गोजमगुंडे यांना पाठिंबा दिला.

मात्र दोन वर्षांचा कार्यकाळ पाहिला तर शिवाय राजकारणाच्या बिराजदार यांच्या पदरात काहीच पडले नाही,दोन वर्षात एक नवीन रुपया मनपाला न मिळाल्याने ज्या उद्देशाने बिराजदार यांनी गोजमगुंडे यांना पाठिंबा दिला होता, तो कोठेही यशस्वी झालेला दिसत नाहीये, उलट तुलनेने पूर्वीचाच भाजपचा सत्तेचा काळ बरा होता, किमान कांही ठळक दिसणारी शहराच्या हिताची कामे तरी झाली होती असे बोलण्याची वेळ उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्यावर नक्कीच आली असेल.

अर्थात ते बोलून जरी दाखवत नसले तरी विचार केला तर या सर्व बाबी त्यांना समजत असणार हे काही वेगळे सांगायला नको, त्यामुळे भाजपाचा अडीच वर्षाचा काळ व आत्ताचा जवळपास दोन वर्षांचा काळ पहिला तर पदावर बसून आपण शहराला कांही तरी वेगळे देऊ ही जी संकल्पना बिराजदार यांची होती, ती पूर्ण तर सोडा, त्याची सुरुवात देखील न झाल्याने, या पार्श्वभूमीवर जर ते काँग्रेस प्रवेश करणार असतील तर ही उघड राजकीय आत्महत्या ठरेल एवढे मात्र नक्की.

साभार : बातमी मागची बातमी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here