वर्धा : सर्वाधिक आवडीचे समाजमाध्यम व्हॉट्सॲपद्वारे कोरोनाबाबत अफवाही पसरविण्यात येत असून, त्या रोखण्यासाठी राज्य पोलीस दलातील सायबर सेलने उपाययोजना आखल्या आहेत.
त्यामुळे वर्धा सायबर सेलचा आता सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर वॉच राहील. एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीय तेढ, अफवा अथवा आक्षेपार्ह मेसेज आल्यास ग्रुप ॲडमिनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
वादग्रस्त आणि अफवा पसरविणारे मेसेज रोखणे ही आता व्हॉट्सॲप ॲडमिनचीच जबाबदारी राहणार आहे. आता केवळ ग्रुप तयार करुन ॲडमिन म्हणून मिरविण्याचे दिवस गेले आहेत. ॲडमिन होण्याबरोबरच आता मोठी जबाबदारीही अंगावर येऊन पडली आहे.
त्याकडे दुर्लक्ष केल्यास गजाआड जाण्याची वेळ येऊ शकते. कोणत्याही व्हाॅट्सॲप ग्रुपवर धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, भाषा आदी कारणांनी वैरभाव वाढवू शकेल, अशी कोणतीही पोस्ट पाठवता येणार नाही.
देशद्रोही, जातीयवाद किंवा वर्णद्वेष पसरवणारे मेसेज टाकल्यास तो गुन्हा ठरणार आहे. व्हॉट्सॲप ॲडमिनलाच आपल्या ग्रुपमधील सदस्यांना लगाम घालावा लागणार आहे. ग्रुपमधील सदस्यांकडून असा प्रकार घडल्यास पोलिसांना कळविणे हे त्याचे कर्तव्य असणार आहे. कोणाचीही बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कारवाईची तरतूद अशी
धार्मिक भावना भडकवणारे अथवा आक्षेपार्ह संदेश पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात दंडासह पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. राष्ट्र किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेष पसरविल्याप्रकरणी भादंविच्या कलम १५३ ब नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
कोणताही धर्म अथवा जातीविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. अफवा पसरवणारे संदेश पोस्ट करणाऱ्याविरुद्ध कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. यात एका वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे.
ॲडमिन आहात, ही काळजी घ्याच
व्हॉट्सॲप ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील प्रत्येक सभासद हा विश्वासार्ह आहे, ही काळजी घेण्याची गरज आहे. गैर वागणाऱ्या सदस्यांबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देण्याची गरज आहे.
व्हॉट्सॲप ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना या संदर्भातील कायदा आणि नियमांची माहिती द्यायला हवी. तसा मेसेज ग्रुपवर टाकायला हवा. ॲडमिनने सातत्याने ग्रुपवर काय प्रकारचा मजकूर प्रसारित होत आहे, याची काळजी घ्यायला हवी.
फॉरवर्ड करताय, काळजी घ्यावी!
कोणताही मेसेज, फोटो, ऑडिओ क्लीप व व्हिडीओ एका ग्रुपवरुन दुसऱ्या ग्रुपवर किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे व्हायरल करत असाल तर तुम्हाला अधिक खबरदारी घ्यावी लागेल.
चुकून एखादी आक्षेपार्ह पोस्ट पूर्ण न वाचता किंवा त्याचा अर्थ समजला नाही तरी फाॅरवर्ड केलीत तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो.
वर्धा सायबर सेलचे लक्ष
– कोणत्याही सदस्याला ग्रुपमध्ये जोडताना त्याची विश्वासार्हता तपासणे बंधनकारक आहे. ग्रुपमध्ये येणाऱ्या प्रत्येक संदेशावर ॲडमिनने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
– सदस्य सूचनेकडे दुर्लक्ष करत असल्यास ‘ओन्ली फॉर ॲडमिन’ अशी सेटींग करावी. आक्षेपार्ह संदेश अथवा अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार करावी.
– आता जातीय तेढ, धार्मिक भावना भडकविणाऱ्यांवर वर्धा सायबर सेल बारीक लक्ष ठेवून आहे.