उदगीर आगारातील एसटीच्या नऊ कर्मचार्‍यांचे निलंबन

0
431

उदगीर : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद पुकारला आहे.

या पार्श्वभूमीवर उदगीर आगारातील कर्मचारी गेल्या  अनेक दिवसांपासून संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सामील आहेत.

हा संप मोडून काढण्यासाठी सरकारने निलंबन करण्याचा सपाटा लावला आहे. याच आदेशानुसार संपामध्ये सहभागी असणाऱ्यांपैकी नऊ कर्मचाऱ्यांवर आगारप्रमुख यशवंत कानतोडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

गेल्या चौदा दिवसांपासून उदगीर बस आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी डेपो समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

राज्य शासनाने यावर अद्यापही कुठलाही तोडगा काढला नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरूच आहे.

याउलट राज्यभरात कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा  आरोप एसटी कर्मचारी करित आहेत.

या आंदोलनात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी नारायण वाघमारे, रफिक शेख, अनुराधा बिरादार, सत्यवान म्हेत्रे (वाहक), शिवराज केंद्रे, भाऊराव दिंडे (चालक), अमित बनसोडे, बाबुराव बिरादार (लिपिक), नामदेव ओहोळ (वेल्डर) यांना निलंबित करण्याचे आदेश आगार प्रमुखांनी काढले आहेत.

शासनाने कितीही दबाव आणून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन परत घेणार नसल्याची माहिती कर्मचारी संघटनेच्या दीपक माने, नारायण वाघमारे, जयश्री व मंगल कदम यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here