समाजाला व्यावसायिक समाज कार्यातील समुपदेशनाची गरज : महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पवार

0
481

लातूर : आपल्या भारत देशामध्ये टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई मार्फत सन १९६० ला व्यावसायिक समाजकार्याची सुरुवात करण्यात आली असून आज समाजाला व्यावसायिक समाजकार्यातील समुपदेशनाची म्हणजेच समुपदेशकाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार यांनी केले.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, समाजकार्य विभाग, लातूर आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व बाल हक्क सप्ताहानिमित्त जाणीव जागृती विशेष कार्यक्रमात त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे होते तर प्रमुख मार्गदर्शिक म्हणून बालकल्याण समिती सदस्य ॲड.रजनी गिरवलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डी.व्हि.कांबळे, समाजकार्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.दिनेश मौने, प्रा.काशिनाथ पवार व प्रा.डॉ.संजय गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन करून दीपप्रज्वलन केले यावेळी महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पवार म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात समाजातील लोकांना समुपदेशनाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे कार्य केले गेले यामध्ये व्यावसायिक समाजकार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

तसेच दत्तक विधान या विषयावर बोलतांना ॲड.रजनी गिरवलकर म्हणाल्या की, आपण सर्वांनी कायदा हा समजून घेतला पाहिजे प्रत्येक बालकाला कुटुंब आणि कुटुंबाला बालक मिळायला पाहिजे.

बालकांची काळजी आणि संरक्षण याकडे केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून न बघता कौटुंबिक भावनेतून बघायला पाहिजे असे सांगून बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळाच्या कार्यपद्धतीची त्यांनी विस्तृत माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाजकार्य विभागप्रमुख प्रा.डॉ.दिनेश मौने म्हणाले की, मराठवाड्यामध्ये सन १९८३ पासून समाजकार्य विभागातर्फे व्यावसायिक समाजकार्यकर्ते निर्माण करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. व्यावसायिक समाजकार्यात क्षेत्रकार्याच्या माध्यमातून शासनाचे विविध सर्वे व इतर सामाजिक उपक्रमांमध्ये विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे योगदान हे सक्रीय असते.

या कार्यक्रमामध्ये धम्मानंद कांबळे यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाची रचना, कार्यपद्धती व विविध उपक्रमाची माहिती सर्वांना करून दिली.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, आमच्या महाविद्यालयामध्ये समाजकार्य विभाग हा सामाजिक भावनेतून कार्य करणारा एक उत्कृष्ट विभाग आहे या विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी समाज उपयोगी कार्यामध्ये सतत सक्रिय सहभागी असतो याचा मनस्वी आनंद होत असल्याचे नमुद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार प्रा.काशिनाथ पवार यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.आशीष स्वामी, बाल संरक्षण अधिकारी सिताराम कांबळे, जिल्हा बाल संरक्षण कार्यालयातील अमर लव्हारे, सुषमा कोकाटे, अजय कुमार भगत, परमेश्वर चीनगुंडे, नंदू काजापुरे, संतोष येंचेवाड, ओम ढमाले, अर्जुन बंडगर, खंडू देडे यांच्यासह समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला समाजकार्य विभागातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here