Oscars 2024 : ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘या’ चित्रपटाची निवड

0
54
Malayalam blockbuster 2018

मुंबई | भारतातील एका मल्याळम चित्रपटाची प्रतिष्ठित ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय फिल्म फेडरेशनने मल्याळम चित्रपट ‘2018’ ची देशातून अधिकृत प्रवेश म्हणून निवड केली आहे. या चित्रपटात टोविनो थॉमस मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरावर आधारित आहे. गेल्या वर्षी ‘आरआरआर’ या तेलगू चित्रपटाने ऑस्करवर दबदबा निर्माण केला होता. ‘नटू नातू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर मिळाला.

यापूर्वी गली बॉय, लास्ट फिल्म शो, पेबल्स आणि जल्लीकट्टू या चित्रपटांना भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले होते. आतापर्यंत केवळ तीन भारतीय चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. त्यात मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान या चित्रपटांचा समावेश आहे. ‘रायटिंग विथ फायर’ आणि ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ या दोन भारतीय माहितीपटांनाही नामांकन मिळाले होते. गेल्या वर्षी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा (लघुपट) ऑस्कर मिळाला होता.

मुख्य अभिनेत्याची प्रतिक्रिया

2018 च्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता टोविनो याने ऑस्कर प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड होणे आमच्यासाठी खरोखरच अविश्वसनीय आहे. केवळ एक अभिनेता म्हणून माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण टीमसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

2018 या चित्रपटाला ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडण्याआधी द केरळ स्टोरी, रॉकी और रानी की प्रेम कहानी, मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे, वाळवी, बलगम, 16 ऑगस्ट यांसारख्या 22 चित्रपटांबाबत विचार करण्यात आला होता. या 22 चित्रपटांपैकी ‘2018 : एव्हरीवन इज अ हिरो’ या चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटात टॉविनो थॉमससोबतच कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here