मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीची स्वच्छता केली. शिवडी किल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती स्वच्छता सेवा अभियानात सहभागी झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ‘एक दिवस एक तास’ या मोहिमेला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून 72 हजारांहून अधिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याची माहिती सीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल आज गिरगाव चौपाटीवर टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थ्यांसह राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान करून स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या राज्यस्तरीय अभियानाला सुरुवात केली.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत घडवण्यासाठी आपण उचललेले हे मोठे पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आज स्वच्छतेची लोकचळवळ झाली आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण अशा 72 हजारांहून अधिक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी त्याचे कौतुक केले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या (2 ऑक्टोबर) राज्यभरात नागरिकांच्या श्रमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल, अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे आदी मान्यवर उपस्थित होते.
या ऐतिहासिक मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. तसंच मुख्यमंत्री म्हणाले की, जेव्हा पंतप्रधानांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा केली आणि स्वतः झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा सर्व लोक या मोहिमेत सहभागी झाले आणि त्यानंतर जो इतिहास घडला, तो सर्व जगाने पाहिला. आणि टीकाकारांना शांत केले. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे स्वच्छता हा केवळ एक दिवसाचा आणि एका माणसाचा कार्यक्रम नसून ती आपली कायमची जीवनशैली असायला हवी.
स्वच्छता कागदावर राहू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
स्वच्छता हीच सेवा मोहीम महत्त्वाची आहे. कागदावर ठेवू नका. काम प्रत्यक्ष मैदानावर दिसले पाहिजे. आजचा दिवस संपत नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असे होऊ नये, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवावे, असे आवाहन केले आहे.