लातूर : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात दि.5.8.2021 पासून लागू करण्यात आला आहे. सदर कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुन देणे हा आहे.
अनेकदा लोकांमार्फ़त बाहेरुन नाष्टा मागविला जातो त्यावेळी अन्न व्यावसायिक हे वडापाव, पोहे या सारखे अन्न पदार्थ न्युजपेपरमध्ये बांधून देतात.
त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासून बनविलेली असते.
अशा न्युजपेपरमध्ये गरम खाद्य पदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण (FSSAI) भारत सरकार यांनी दि.6 डिसेंबर 2016 रोजी आदेश निर्गमित करुन त्याबाबत सुचना दिल्या आहेत.
तरी सर्व अन्न व्यवसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीट मार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, न्युज पेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे; अन्यथा त्यांचेविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन म.राज्य, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.