मुंबईतील दुचाकीच्या रेसलिंग स्पर्धेत लातूरच्या ‘नरेश कनामे’ने पटकावले द्वितीय पारितोषिक

0
305

लातूर : येथील भूमिपुत्र नरेश नागनाथ कनामे हा तरुण सध्या देशांतर्गत होणार्‍या दुचाकीच्या रेसलिंग स्पर्धेत छाप पाडत आहे. नुकतेच त्याने मुंबईत झालेल्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

धाडसी खेळांमध्ये महाराष्ट्रातील मुलांचा समावेश कमीच असतो. शिक्षणाचा आणि गुणवत्तेचा लातूर पॅटर्न म्हणून राज्यात लातूरची ओळख निर्माण झाली आहे.

त्यातूनच धाडसी क्रिडा प्रकारात कोणी सहभागी होत असेल तर एक प्रकारचे कुतूहल सर्वांच्या मनात दिसून येते. लातूर शहरातील नरेश नागनाथ कनामे हा तरुण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मेकॅनिकलची आवड असणार्‍या नरेशने इंजिनिअरींगमधे प्रवेश घेतला परंतु शिक्षणापेक्षाही प्रत्यक्ष साहस व वेगाची आवड असल्याने त्याने दुचाकीच्या रेसलिंग क्रिडा प्रकाराकडे लक्ष दिले आणि त्यामध्येच करिअर करण्याचे ठरवले.

स्वतःच्या दुचाकीमध्ये फेरफार करून त्याने ती दुचाकी रेसींगमधील वापरल्या जाणार्‍या दुचाकीप्रमाणे तयार करून घेतली.

2017 पासून सुरू झालेला त्याचा प्रवास अल्पावधीतच देशातील पहिल्या दहाजणांच्या यादीत जाऊन पोहचला आहे.

या क्षेत्रातील तशी फारशी माहिती नव्हती, शिकवणारे कोणी नव्हते. परंतु स्वतःच दुचाकीवर लातूरच्या विमानतळावरील निर्मुनुष्य रस्त्यावर स्टंट करत शिकणे सुरू ठेवले.

त्यानंतर थेट कोईंबतूर गाठले आणि रजनीकृष्णन मोटार स्पोर्टस अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. पहिल्याच प्रयत्नामध्ये लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये 98 टक्के मिळवून उत्तीर्ण झाला. 2020 मध्ये चेन्नई येथे झालेल्या नॅशनल चॅम्पीयनशिपमध्ये सहभाग नोंदवला.

या मध्ये देशातील सर्व कंपन्यांचा सहभाग होता. या स्पर्धेत पहिल्या 10 मध्ये येण्याचा बहुमान नरेश याने मिळवला.

यावर्षीच्या स्पर्धेत सहभागी होण्यापुर्वीच झालेल्या अपघातामुळे स्पर्धेतील तीन राऊंडमध्ये भागच घेता आला नाही. आता उर्वरित 2 राऊंडची तयारी सुरू केली आहे.

रॉयल इनफिल्डने नुकतीच कॉन्टीनेंटल जीडी 650 सी.सी. रायडींग बाईक लॉन्च केली आहे. रेसींगमध्ये गाडी उतरवण्यासाठी त्यांनी देशभरातून रायडरची निवड करण्यासाठी सर्वांना आमंत्रित केलेले होते. 2 हजार जणांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता.

यातून केवळ 200 जणांना प्रारंभी निवडले गेले. त्यामधून केवळ 18 जणांचीच निवड करण्यात आली. यामध्ये नरेश कनामे याचीही निवड झाली. त्याच्यासाठी ही मोठी संधी होती.

आपण नेमके कुठे आहोत हे त्यामुळे समजते असे त्याने सांगितले. कोईम्बतूर येथे 18 ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत झालेल्या स्पर्धेत त्याने 12 वे आणि 10 वे स्थान पटकावले होते.

7 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबई येथे झालेल्या देशपातळीवरील स्पर्धेत नरेश कनामे याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. सर्वाधिक जोखीम आणि धैर्याचा हा खेळ आहे त्यामुळे महाराष्ट्रात हा खेळ दुर्लक्षितच आहे.

मात्र, तामिळनाडूमधील रायडर यामध्ये अधिक आहेत. यासाठी फिटनेस आवश्यक आहेच परंतु त्यासोबतच उच्च मनोबल आवश्यक आहे. सध्या नरेश देशातील नॅशनल लेव्हलमध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये आहे.

यामध्ये असणारे पहिल्या 5 क्रमांकाचे रायडर हे देशाचे आशियामध्ये प्रतिनिधीत्व करतात. दरवर्षी होणार्‍या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान 2 लाख रुपये वैयक्तीक खर्च करावे लागत आहेत त्याशिवाय रेससाठी लागणारी दुचाकी ही वैयक्तीक खर्चातूनच घ्यावी लागतेय.

त्यामुळे या खेळाडूंना शासनाचे, समाजाचे, विविध संस्थांचे पाठबळ आवश्यक आहे परंतु ते मिळत नाही ही खंत ही नरेशने व्यक्त केली.

शासनाने रायडींग स्किल डेव्हल्पमेंटसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. काही संस्थांनी आपणास स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here