बुलडाणा : राज्यात नवे उद्योग कसे आणता येतील याकडे नारायण राणे यांनी भर देण्याची गरज आहे. शिवसेनेवर कुत्र्यासारखे भुंकणे बंद करा, असे विधान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.
बुलडाण्यात गायकवाड यांनी आज शहरातील मुख्य पाणी प्रश्नावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांना दैनंदिन पाणी पुरवठा कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली.
उद्यापासून बुलढाणा शहरात दररोज अर्धा तास पाच दिवस पाणी पुरवठा केला जाणार असून त्यानंतर कायम एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. ही बुलढाणा शहरवासीयांना दिवाळी भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
गायकवाड यांनी पाठीमागील काळात नारायण राणे यांना घरात घुसून मारू असे वक्तव्य केले होते. नारायण राणे आज बुलढाण्यातील चिखली येथे उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.
या संदर्भात गायकवाड यांना, नारायण राणे चिखली येथे आले आहेत आता तुमची भूमिका काय असं विचारलं असता, “राणे यांनी नसते उद्योग करू नये त्यांनी राज्यात नवीन उद्योग आणून बेरोजगारी कशी कमी करता येईल याकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष्य देऊन काम करायला पाहिजे” असा टोला लगावला.
तसेच नारायण राणे यांनी शिवसेनेवर कुत्र्यासारखे भुंकणे हा उद्योग बंद करावा अशी जहरी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी बोलताना केली.