राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयं येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मुंबई : महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून (Collage Reopen) सुरू करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, कॉलेज सुरू करताना आम्ही नियमावली तयार केली असून सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना ती पाठवणार आहे.
त्यानुसारच 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरु करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करुन निर्णय घ्यायचा आहे. हा अधिकार आम्ही विद्यापीठांना दिला आहे.
काय आहेत नियम?
- कोरोना संसर्ग कमी झालेल्या ठिकाणी 50 टक्केपेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- यात महत्वाची सूचना अशी की विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेलं असणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना प्राधान्याने महाविद्यात बोलावलं पाहिजे.
- कोरोना लसीकरण पूर्ण झालेले नसतील तर विद्यापीठ, महाविद्यालयाने पुढाकार घेऊन जिथल्या स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरातच लसीकरण राबवले पाहिजे.
- ज्या परिसरात कोरोना वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी स्थानिक प्रसासनाशी चर्चा करुनच कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे.
- तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती पाहून नियमावली बदलण्याचा अधिकारी आम्ही विद्यापीठ, महाविद्यालयांना दिलं आहे.
- परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली तयार करायची आहे.
- जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोय महाविद्यालयांनी करुन द्यायची आहे.
- टप्प्याटप्प्याने वसतीगृह सुरू करण्यास आम्ही परवानगी देण्यात आली आहे.
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या सूचना आम्ही विद्यापीठ आणि महाविद्यालयांना दिली आहे.
- ज्यांनी दोन डोस घेतले आहेत अशा विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी विनंती आहे की कोरोना नियम पाळणे बंधनकारक आहे.
पुण्यात सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होणार का?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर, कालपासून पुण्यात सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण जोपर्यंत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत कॉलेज सुरु करणार नसल्याचं अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे.
आज राज्यातील महाविद्यालयाबाबत निर्णय झाला आहे. पुण्यातील स्वायत्त महाविद्यालय सुरु झाली आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती.