लातूर : मराठा आरक्षणासाठी लढलेले मनोज जरंगे पाटील उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांचे लातूर शहरात आगमन होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यांच्या कार्याबद्दल मोर्चाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर क्रांती मोर्चाच्या वतीने नुकतीच समाज बांधवांची बैठक घेण्यात आली असून व्यापक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या या कार्यक्रमास सकल मराठा समाज बांधव, भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nanded News | शासनाच्या दुर्लक्षामुळेच नांदेडात मृत्यूचे तांडव
दरम्यान, त्याच दिवशी दुपारी दोन वाजता लातूर तालुक्यातील गाढवड येथे जरंगे पाटील यांची सभा होणार आहे. या बैठकीला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.