लातूर जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेसप्रणित दिलीपराव देशमुख यांच्या सहकार पॅनलचा 18 जागांवर विजय

0
115
latur dcc bank election

लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसप्रणित माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांनी भाजपाप्रणित पॅनल उमेदवारांचा दणदणीत पराभव करत बँकेच्या 19 जागांपैकी 18 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

देवणी तालुका सोसायटी मतदार संघातून सहकार पॅनलचे उमेदवार गोविंद भोपनीकर व भाजपाप्रणित विरोधी पक्षाचे उमेदवार भगवान पाटील तळेगावकर या दोघांना प्रत्येकी 17 मते समान पडल्याने निवडणूक अधिकारी यांनी दोघांची चिठ्ठी काढली. त्यात भगवान पाटील तळेगावकर विजयी झाले आहेत.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी निवडणूक होती. यापुर्वीच 10 जागांवर सहकार पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे असून आमदार धिरज देशमुख (प्रक्रिया मतदार संघ), आमदार बाबासाहेब पाटील (अहमदपूर), अशोकराव पाटील निलंगेकर (निलंगा), अ‍ॅड.श्रीपतराव काकडे (औसा), मारुती पांडे (जळकोट), एन.आर. पाटील (चाकूर), राजकुमार पाटील (लातूर), लक्ष्मीबाई चंद्रशेखर भोसले (उदगीर), अ‍ॅड.प्रमोद जाधव (रेणापूर), जयेश माने (मत्स्य सहकारी संस्था) हे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने केवळ 9 जागांसाठी निवडणूक झाली. सोमवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू झाली.

त्यात सहकार पॅनलचे उमेदवार व्यंकटराव पाटील बिरादार (शिरुर अनंतपाळ तालुका सोसायटी मतदार), पृथ्वीराज शिरसाठ (अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ), अशोक गोविंदपूरकर (पतसंस्था मतदारसंघ), दिलीप पाटील नागराळकर (मजुर मतदारसंघ), अनुप शेळके (ओबीसी मतदारसंघ), सपना किसवे (विशेष मागास प्रवर्ग), अनिता केंद्रे (महिला मतदारसंघ), स्वयंप्रभा पाटील (महिला मतदारसंघ) हे सर्व उमेदवार सहकार पॅनलचे विजयी झाले आहेत. तर देवणी तालुका सोसायटी मतदारसंघात सहकार पॅनलचे उमेदवार गोविंद भोपनीकर व भाजपा प्रणित पॅनलचे उमेदवार भगवान पाटील तळेगावकर या दोघांना प्रत्येकी 17 समान मते पडल्याने दोघांच्या नावाने चिठ्ठी टाकण्यात आली. त्यात भगवान पाटील तळेगावकर यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here