लातूर : निराधारांना आधार देण्यासाठी लातूर शहरातील प्रत्येक प्रभागात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नुकताच लातूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा झोन निरीक्षक चांदपाशा इनामदार यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील बरकतनगर परिसरातल्या डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम शाळेत संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना चाँदपाशा इनामदार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना विकासरत्न विलासराव देशमुख यांनीच निराधारांच्या अनुदानात दुपटीने वाढ केली होती, असे नमुद केले.
यावेळी बोलताना चांदपाशा इनामदार म्हणाले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिर हे लातूर शहरातील प्रत्येक प्रभागात आयोजित करण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या काळात या योजनेला सुरुवात झाली. तेव्हा लोकनेते विलासराव देशमुख या योजनेचे लातूरचे अध्यक्ष होते. पूर्वी साठ रुपये प्रमाणे प्रत्येक पात्र निराधार लाभार्थीना अनुदान दिले जात होते. जे लोकनेते विलासराव देशमुख यांच्यामुळे दुप्पट करण्यात आले.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा १९८३ ला पहिला कार्यक्रम लातूर शहरात सर्व अधिकारी तलाठी व डॉक्टर यांना घेऊन राबवला गेला होता. आज सर्वसामान्यांच्या दारापर्यंत येऊन फॉर्म भरून घेऊन पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
शहरात आजपर्यंत महानगरपालिका, घरकुल लाभार्थी यांचे काम पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे नगरसेवक करत आले आहेत यापुढेही करत राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना अनद शेख अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याबद्दल मी उपक्रम राबवणा-या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.
सर्वांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत आपणाला त्या माहिती नसतात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यामुळे हे शिबिर होत आहे.
या प्रभागातील पात्र लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित घेऊन या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच १८ वर्ष पूर्ण केलेल्या सर्वांनी मतदान ओळखपत्र ही काढून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.
संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीम शेख मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पात्र लाभार्थ्यांचे तहसीलमध्ये चकरा मारण्याचे या शिबिरामुळे वाचणार आहे.
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार हे सर्व काम चालू आहे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी यापूर्वीही जनसेवेचे काम करत होते आता ही ते जनसेवेचे काम करत आहेत पुढेही ते करत राहतील. माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेमुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पात्र लाभार्थ्यांना विना अनामत बँक खाते उघडून देत आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करीत उपस्थितांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविक नगरसेवक सचिन बंडापल्ले यांनी केले. यावेळी लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अॅड. समद पटेल, ज्येष्ठ पत्रकार तथा जनसंपर्क अधिकारी पांडुरंग कोळगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव गोरोबा लोखंडे, शैलेश बोईनवाड, भाऊसाहेब भडीकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मियासाब सेवाभावी शैक्षणिक संस्था बोरीचे अध्यक्ष जब्बार सगरे,
महेश काळे, नजीब सय्यद, कासीम शेख, मुख्याध्यापक पटेल, मनुवर शेख, शमसुद्दीन सगरे, निजाम शेख, ख्वॉजाभाई शेख, हमजा पटेल, सुमित भडीकर, राज क्षिरसागर, कार्यालय प्रभाग समन्वयक दत्ता इंगळे आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तहसील कर्मचारी, बुथप्रमुख, निराधार महिला, पुरुष उपस्थित होते. शेवटी या कार्यक्रमाचे आभार जब्बार सगरे यांनी मानले.