राजकारण | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी नेहमी प्रमाणे नाराजीचे नाट्य घडवले. मागील काही दिवसांपासून अजित दादांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. या पदासाठी अजित पवार खूप उत्सुक होते, त्यासाठी चक्क ते रुसून कोपऱ्यात जाऊन बसले. आज माझा रुसायचा मूड आहे, असे जाहीर करून मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. दिल्लीहून तातडीचा ‘कॉल’ आल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तो ‘आदेश’ शिरसावंद्य मानला, पण पूर्वनियोजित कार्यक्रमाचे कारण देत दादांनी दिल्लीला जाण्याचे टाळले. दादांची पोटदुखी आणि नाराजी दिल्लीस्वारांच्या लक्षात आली. त्यांनी नेमका उपचार सांगितला आहे, दादांची इच्छा पूर्ण करण्याचे ठरले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. शिवाय राष्ट्रवादीच्या नऊ पैकी सात मंत्र्यांकडे विविध जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या आल्या आहेत. शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पालकमंत्र्यांना जबाबदारी पार पाडावी लागते. जिल्ह्यात शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होते की नाही यावर पालकमंत्री लक्ष ठेवतात. तसेच शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्याला मिळावा यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे. विकासकामांसाठीचा निधी नियोजनानुसार वापरला जात आहे की नाही, याकडेही पालकमंत्र्यांना लक्ष ठेवावे लागते.
राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्यास पालकमंत्र्यांना स्वागताला उपस्थित राहावे लागते. जिल्ह्याची सर्व सूत्रे पालकमंत्र्यांच्या हातात असतात. सर्व शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार किंवा आदेशानुसार काम करत असते. विरोधी पक्षाचा आमदार असेल तर त्याच्या मतदारसंघातील कामे कशी थांबवायची किंवा जास्त निधी द्यायचा नाही, विरोधकांची कोंडी कशी करायची हे सर्व पालकमंत्र्यांच्या हातात असते. अखेर गेल्या तीन महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आली.
अनेकांच्या विरोधाला न जुमानता अर्थ खाते मिळालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपदही मिळाले. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पालकमंत्रीपदावरून चंद्रकांतदादा नाराज असल्याची चर्चा आहे. सुमारे तासभर चर्चेनंतर फडणवीस यांनी चंद्रकांत दादांशी ‘समझोता’ केल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात चार लोकसभा मतदारसंघ असल्याने भाजप नेतृत्वाने अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदाची इच्छा पूर्ण केली असावी, असा अंदाज मांडला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची कुजबुज सुरू होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित रहात नव्हते. मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती, इतर खात्यांच्या बैठका घेतल्याने होणारा वाद, पालकमंत्रिपदाची न सुटलेली कोंडी, साखर कारखान्याचा थक हमी बद्दलचा निर्णय फिरवण्याचा लाजीरवाणा प्रसंग यामुळे अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दौऱ्यात देखील उपस्थित नव्हते. अजित दादांच्या आजारपणावर पालकमंत्री पदाचे जालीम औषध देण्याचा निर्णय दिल्लीत झाला. राजकारणात, कधी आणि कोणत्या कारणाने ‘आजारी’ पडेल किंवा मंत्रिमंडळाची बैठकीतून काढता पाय घेईल, किंवा आजारपणाचे खोटे कारण सांगून दौरे किंवा बैठका पुढे ढकलतील हे सांगता येत नाही. लोकांनाही अशा खोट्या आजारपणाची सवय झालेली आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या घटक पक्षांमध्ये छोटी-मोठी नाराजी आणि रुसवे फुगवे कायम आहेत. त्याची झलक आणि नाराजी नात्याचे प्रदर्शन पालकमंत्री पदावरून साऱ्या राज्याला पाहायला मिळाले.
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अधिवेशन होऊन बराच काळ लोटला तरी कोणताही निर्णय न झाल्याने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री नाराज होते. एकाएकी अजितदादांचा ‘आजार’ बळावत चालला होता. या आजारावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली, पण इलाज सापडला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस योग्य उपचार आणि औषधीच्या शोधात थेट दिल्ली पर्यंत गेले. तिथे त्यांना एकदम ‘रामबाण’ उपाय सापडला. बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली. हा प्रभावी ‘डोस’ लागू झाला आणि अजित पवारांचा आजार एका दिवसात संपला. पुन्हा आजार तोंड वर काढण्याची शक्यता असली तरी सध्या पुरते औषध देऊन आजाराचे प्रमाण कमी केले आहे.
या सर्व नाराजी नात्यातील मुख्य पात्र असणारे चंद्रकांतदादा पुण्याचे पालकमंत्रीपद सोडायला तयार नव्हते, पण राजकारण म्हटले की काही तडजोडी मानाविरुध्द कराव्या लागतात. त्यामुळे इच्छा पूर्ण झाल्यामुळे अजित पवार यांचा कथित आजार दूर होऊन ते नेहमीच्या उत्साहाने कामाला लागतात कि पुन्हा कुथत कण्हत काम करतात हे पाहावे लागणार आहे. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे वर्चस्व असले तरी या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.
धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तेथे बहिण पंकजा मुंडे यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करणार हे उघड आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या असल्या तरी त्या करत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्या भाजपवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या समर्थकांनी तर भाजपाला अद्दल घडविण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी मदत निधी उभारून आपल्या मनातील खदखद दाखवून दिली आहे. सर्व सत्तेच्या मलिदा वाटपात राष्ट्रवादीच्या नेत्यांना झुकते माप देऊन हवे ते जिल्हे देण्यात आल्याचे दिसून येते. या संधीचा उपयोग राष्ट्रवादीचे पालकमंत्री आपल्या पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी करतील, हे उघड आहे.
ट्रिपल इंजिन सरकारमध्ये राष्ट्रवादीला सांभाळण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. अजित पवार हे आता मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देतो, पण सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि यापुढेही राहतील. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पाच वर्षांसाठी संधी मिळणार आहे. त्यामुळे दादा कधी मुख्यमंत्री होतील, हे सांगणे कठीण असले तरी सध्या दादांचा रुसवा दूर झाला आहे. आगामी काळात कसा कारभार करतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read More