कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती होऊन सर्वांनी लस घ्यावी. यासाठी चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीनिवास हसनाळे यांनी वेगळ उपक्रम राबवित शहरातील दोन विवाह समारंभाच्या ठिकाण लसीकरण कॅम्प लावला. यात वऱ्हाडी मंडळींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कोरोना लसीकरणात वाढ व्हावी. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. यातच ‘हर घर दस्तक’ ही मोहीम सर्वत्र सुरु आहे. यात आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन लस देत आहेत. तालुक्यात ६० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
उर्वरित लसीकरणासाठी तहसीलदार डाॅ.शिवानंद बिडवे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सचिन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीनिवास हसनाळे यांनी वेगळा उपक्रम राबविला.
चाकूर शहरात रविवारी (ता.२१) शिवकुमार गादगे व शिवशंकर आवळे यांचे दोन ठिकाणी विवाह समारंभ होते, यात त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊन लसीकरणचा कॅम्प लावला.
यात नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. यासाठी आरोग्य कर्मचारी संगीता होनराव, शोभा स्वामी, विनोद चव्हाण, मनोज जाधव यांनी पुढाकार घेतला.
लसीकरणासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, विविध समारंभात अनेकजण जमा होतात. या ठिकाणी लसीकरणासाठी बोलविल्यास चापोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तेथे कॅम्प लावला जाईल ‘लग्न तिथे लसीकरण’ या माध्यमातून जास्तीत-जास्त नागरिकांना लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे.