ऐकाव ते नवलच : विनयभंग प्रकरणातील आरोपी काँग्रेसचा ‘जिल्हाध्यक्ष’ | पदासाठी आरोपी असणे आवश्यक, काँग्रेसचा नवीन निकष ?

0
817
लातूर कॉंग्रेस

लातूर : राजकीय आयुष्यात काम करत असताना वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन केली जातात,व अगदी लहान कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यापर्यंत राजकीय गुन्हे नोंद देखील केली जातात,हा राजकारणातील नियमित भाग व सर्वच राजकीय पक्षाची हीच अवस्था.

त्यामुळे असे गुन्हे असतील तर प्रत्येक राजकीय पक्ष याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही.किंबहुना असे गुन्हे दाखल होणे हा राजकारणाचा एक भागच.मात्र 354 अर्थात महिलेचा विनयभंग,420 म्हणजे फसवणुक असे गंभीर गुन्हे दाखल असतील तर प्रत्येक राजकीय पक्ष अश्या व्यक्तीपासून दूर राहत योग्य काळजी घेते,मात्र लातूरमध्ये भलताच प्रकार समोर आला असून विनयभंग प्रकरणात आरोपी असलेल्या आनंद पवार यांना लातूर काँग्रेसचा डॉक्टर सेलचा अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे पद पाहिजे असेल तर आता गंभीर गुन्ह्यात आरोपी असणे हा नवीन निकष लावला गेला आहे का? असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना पडला तर नवल वाटायला नको.

याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्हयातील अहमदपूर येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मित्र नगर येथे हॉस्पिटल असलेले डॉक्टर आनंद पवार यांच्यावर 21 नोव्हेंबर 2018 रोजी 354 अर्थात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला,सदरील डॉक्टरला त्याच दिवशी अटक करण्यात आली व दुसऱ्या दिवशी लातूरच्या न्यायालयासमोर हजार करण्यात आले.

लातूर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सदरील आनंद पवार यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र तेथे देखील दिलासा न मिळाल्याने परत लातूरच्या जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला व पवार यांना जामीन मिळाली.सध्या हे प्रकरण सुरू असून पोलिसांनी चार्जेशीट देखील दाखल केली आहे ज्यात आनंद पवार यांना आरोपी करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे हा गुन्हा लातूरचे माजी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या कार्यकाळात घडल्याने सांगळे यांचा एकंदरीत कारभार पाहता ते फार शिस्तप्रिय व कायद्याने काम करणारे होते अशीच त्यांची प्रतिमा असल्याने त्यांनी देखील या विषयाकडे लक्ष दिले होते.एवढेच नव्हे तर शहरातील एका महिलेने आनंद पवार यांच्यावर 420 अर्थात फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल केला आहे. असे असताना लातूरच्या काँग्रेसच्या कारभाऱ्याने डॉक्टर सेलचा अध्यक्ष आनंद पवार यांना केले आहे. तसे पत्र प्रदेश काँग्रेसने आनंद पवार यांना 14 ऑगस्ट 2021 रोजी दिले आहे.

साधारणतः या नियुक्त्या शहर जिल्हाध्यक्ष प्रदेशाकडे नावे शिफारस करते व तेथून त्यांच्या नावाची घोषणा होत असते.त्यामुळे एका आरोपीला पक्षाचा अध्यक्ष करण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली व हे काँग्रेसच्या नेत्यांना जे नेते अश्या प्रकारणापासून चार हात लांब असतात त्यांना कशी पटली हा आश्चर्याचा भाग आहे की मग लातूर काँग्रेसमध्ये एका ठराविक व्यक्तीची मक्तेदारी झाली आहे.

परिणामी जो निर्णय घेतला जाईल त्याला सहमती दिली जाते आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत असून आता काँग्रेसचे पद हवे असेल तर गुन्ह्यात आरोपी असणे आवश्यक आहे का असा सवाल काँग्रेसचेच कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. सध्या काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष हे एक विधिज्ञ आहेत,त्यांनी अश्या आरोपीची शिफारस करावी व त्याला नेत्यांनी परवानगी द्यावी, म्हणजे या प्रकरणात आनंद पवार यांना राजकीय सरंक्षण देण्यासाठी त्यांना हे पद दिले गेले आहे का?

हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.त्यामुळे जे कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षाचे काम निष्ठेने करतात त्यांनी पुढील काळात असे काही तरी भलतेच उद्योग करावेत का ? जेणेकरून त्यांना पक्षाचे पद मिळेल व हा नवीन निकष जन्माला आलाय का अशी चर्चा आता काँग्रेसचेच कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

अनेक “लायक” डॉक्टर होतेच की !

दरम्यान लातूरच्या डॉक्टरांचे व राजकारण्यांचे संबंध हे जगजाहीर आहेत,अगदी लातूरमध्ये झालेल्या मंत्र्यांच्या नागरी सत्काराचे प्रायोजक हे डॉक्टरच होते,शिवाय कोणतीही निवडणूक असो त्यात फायनान्स हे डॉक्टरांचेच असते असे नेहमीच बोलले जाते.त्यामुळे अनेक डॉक्टर नेहमी नेत्यांच्या पुढे मागे करण्यात, नेत्यांची लाळ पडेपर्यंत स्तुती करण्यात अग्रेसर असतात.एवढेच काय लोटांगण घालयाचच बाकी ठेवतात असे बरेच डॉक्टर आहेत.

अर्थात त्यांच्या साम्राज्याला राजकीय संरक्षण पाहिजे असतेच.त्यामुळे असे अनेक लायक डॉक्टर होते ज्यांना या पदावर बसविता आले असते व त्यांना पुढे पुढे करण्याचे,लाळ गाळण्याचे बक्षीस देता आले असते मात्र विनयभंग च्या प्रकरणात आरोपी असलेल्या डॉक्टरला जर पद दिले जात असेल तर त्याला राजकीय संरक्षण देण्यासाठी हे पद दिले गेले आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

जावेद शेख
साभार : बातमी मागची बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here