सहकार पॅनल’ला भरभरून आशीर्वाद द्या : आमदार धीरज देशमुख

0
279

रेणापूर : राज्यात दिशादर्शक बँक म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओळखली जाते. सहकारमहर्षी व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा कारभार अतिशय पारदर्शी व उत्तमरित्या सुरु आहे.

त्यांनी उभ्या केलेल्या ‘सहकार पॅनेल’च्या मागे आपण खंबीरपणे रहा व सहकारात चांगले काम करणा-यांना मतांच्या माध्यमातून भरभरून आशीर्वाद द्या, असे आवाहन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी येथे बोलताना केले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेल उर्वरित ९ जागांसाठी निवडणूक लढवत आहे. या उमेदवारांच्या प्रचारार्थ रेणापूर तालुक्यातील कामखेडा, पोहरेगाव, पानगाव व खरोळा येथे भेट देऊन आमदार धिरज देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधला. या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल धिरज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार धिरज देशमुख म्हणाले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक सुविधा खातेदारांच्या दारापर्यंत पोहचविण्याची सोय केली आहे. सोयाबीन, तूर, हरभरा पीक उत्पादक, बागायतदार, पशुपालकांना तसेच, घर, आरोग्य, शिक्षण, लग्न अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सर्वसामान्यांना विविध योजनांतून मदतीचा, सहका-याचा हात बँकेने पुढे केला आहे. अनेकांचे संसार उभे केले. कोरोना काळातही बँकेने लोकोपयोगी काम केले.

शेतकरी बांधवांना ५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अशा अनेक महत्वपूर्ण निर्णयांचे स्वागत राज्यातील अन्य जिल्हा बँकांनी वेळोवेळी केले. इतकेच नव्हे तर या निर्णयांचे अनुकरणही केले.

अफवांवर विश्वास ठेवू नका सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी एका विचाराने ही बँक चालवून दाखवली. अडचणींवर मात करीत, पारदर्शक कारभारातून या भागाची आर्थिक उन्नती केली. त्यामुळेच जिल्हा बँक उजळ माथ्याने कार्य करीत आहे.

लोकांना सेवा देत आहे. म्हणूनच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला भरभरून मत द्या. विरोधकांकडून अपप्रचार पसरवला जात आहे. त्यावर आणि त्यांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here