उदगीरमध्ये AIMIM ला मोठा हादरा, AIMIM जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले !

0
777

मुंबई : लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेची (Udgir Municipal Council Election) निवडणूक जवळ आली असताना राजकीय हालचालीं वेगाने घडू लागल्या आहेत. नगरपालिकेतील पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीने आपल्या गळाला लावले आहे.

इतकेच नाही तर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने खेळलेल्या या खेळीमुळे एमआयएमला (MIM) एक मोठा झटका बसला आहे.

उदगीर नगरपालिकेत एमआयएमचे एकूण सात नगरसेवक आहेत. या सात नगरसेवकांपैकी पाच नगरसेवक मुंबईत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले आहे. यासोबतच एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

यावेळी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, ना.नवाब मलिक, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर आदी उपस्थित होते.

सध्यस्थितीत उदगीर नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. नगरपालिकेची एकूण सदस्य संख्या 44 इतकी आहे. यापैकी भाजपचे 23 सदस्य, काँग्रेसचे 14 एमआयएमचे 7 सदस्य होते. राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी नगरपालिका निवडणुकीपूर्वी खेळी खेळून एमआयएमचे पाच नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत.

काही महिन्यात उदगीर नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदगीरमध्ये राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे. लातूर जिल्ह्यात एमआयएमला पाठबळ देणारे शहर म्हणून उदगीर ओळखले जाते.

येथील नगरपालिकेत सात नगरसेवक हे निवडून आले होते आणि त्यापैकी पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता आगामी निवडणुकीत याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा फायदा होतो हे पहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here