मोबाईलचा खेळखंडोबा : आधी तर कॉलच लागत नाही, लागला तर आवाज येत नाही !

0
362

लातूर : सरकार नागरिकांना जबरदस्तीने डिजिटल इंडियाकडे ढकलत आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून काही खासगी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क वारंवार विस्कळीत होत असल्याने नागरिकांच्या समस्याचं वाढल्या आहेत.

कॉल कनेक्ट न होणे. कनेक्ट झाला, तर ज्याला कॉल केला आहे, त्या व्यक्तीचा आवाज न येणे किंवा आपला आवाज त्यांच्यापर्यंत न पोहोचणे. अचानक नेटवर्क गायब होणे, डेटा कनेक्टिव्हिटी खंडित होणे अशा अनंत तक्रारी सध्या काही खासगी कंपन्यांची सेवा घेणाऱ्या मोबाइलधारकांना भेडसावत आहेत.

दुरसंचार क्षेत्रात क्रांती होऊन अनेक खासगी कंपन्या बाजारात आल्याने स्पर्धा वाढली व परिणामी मोबाइल सेवा अधिक दर्जेदार व स्वस्त होत गेली.

त्यामुळे मोबाइलधारकांची संख्या कमालीची वाढली असून, प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन आला. लातूर जिल्ह्यासह खेड्यापाड्यात विविध मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्या कार्यरत असून, त्यांचे मोठे नेटवर्क आहे.

ग्राहकांना दर्जेदार व चांगली सेवा देण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी शहरात फायबर ऑप्टिक केबलचे जाळे टाकले. यामुळे सेवा अधिक चांगली होणे अपेक्षित होते.

तथापि, गत काही महिन्यांपासून काही खासगी मोबाइल कंपन्यांची सेवा अत्यंत सुमार दर्जाची झाली असून, वारंवार नेटवर्क खंडित होणे, नेटवर्क असतानाही कॉल न लागणे, रिंग न वाजणे, अचानक कॉल डिस्कनेक्ट होणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत.

भरमसाठ सेवा शुल्क घेणाऱ्या कंपन्यांकडून तक्रारींची निरसण होत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत.

फ्रिक्वेन्सीबाबत हेरफेर?

भारतीय दुरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांना विशिष्ट फ्रिक्वेन्सी बहाल केली असून, या निश्चित फ्रिक्वेन्सीनुसारच सेवा देणे बंधनकारक आहे.

खासगी कंपन्या मात्र उच्च फ्रिक्वेन्सीचा वापर करतात व यामुळेच कॉल ड्रॉप, नेटवर्क खंडित होणे यासारख्या समस्या उद्वभण्याची शक्यता असते, असे दुरसंचार क्षेत्रातील एका तज्ज्ञ व्यक्तीने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.

ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा

कोरोना संसर्गामुळे सध्या शहरातील प्राथमिक शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षणावरच मदार आहे. क्लास सुरू असताना अनेकदा इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित होते. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

तक्रार करावी तरी कुठे?

सरकारी भ्रमणध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपनीची तक्रार असेल, तर त्यासाठी मंच उपलब्ध आहे. खासगी कंपन्यांच्या सेवेबद्दल तक्रार कुठे करावी, असा प्रश्न मोबाइलधारकांना पडला आहे. कस्टमर केअरला फोन केला, तर तिकडेही समाधानकारक उत्तर मिळत नाही.

पोर्टेबिलिटी करणाऱ्यांची संख्या वाढली

एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्यासाठी पोर्टेबिलिटीचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल क्रमांक कायम राहतो; परंतु सेवा देणारी कंपनी बदलली जाते.

काही कंपन्यांची सेवा पुर्वीसारखी दर्जेदार नसल्याचे कारण पुढे करत अनेक जण पोर्टेबिलिटीचा पर्याय वापरत आहेत.

मोठमोठे टाॅवर शोभेसाठीच आहेत काय?

खासगी कंपन्यांचे मोठमोठे टॉवर आहेत; परंतु दिव्याखाली अंधार या म्हणीप्रमाणे टॉवरखालीच नेटवर्क नाही, अशी परिस्थिती आहे. घरातून तर फोनच लागत नाही. फोन आला की बाहेर जावे लागते. इंटरनेट कनेक्टिव्हिटीही मिळत नाही.

चंद्रकांत रोडगे, मोबाइलधारक

आमच्या भागात नेहमीच नेटवर्क विस्कळीत असते. कधी- कधी नेटवर्क असतानाही फोन लागत नाही किंवा येतही नाही. गत दोन- तीन महिन्यांपासून ही समस्या वाढली आहे. मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाचाही यामुळे खोळंबा होत आहे.

प्रा.प्रदीप वीरकपाळे, शिक्षणतज्ञ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here