लातूर : लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासीक आणि समृध्द सांस्कृतिक वारसा आहे. येथे प्राचीन काळातील विपूल ताम्रपट, शिलालेख, हस्तलिखीत साधने आहेत. लातूर जिल्ह्यातील खरोसा, कळमगाव, हसेगाववाडी, हत्तीबेट, लोहारा येथे लेणी आहेत. नुकतेच चाकूर तालुक्यातील जानवळ येथील बेटावर प्राचीन काळातील लेणींचे संशोधन करण्यात आल आहे.
जानवळ गावच्या दक्षिण बाजूस असलेल्या टेकडीवर दोन लेणी खोदलेल्या असल्याची माहिती महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील प्रा. डॉ. माधवी महाके आणि पानगांव येथील इतिहास संशोधक आणि शिलालेख अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी दिली असून, यातून लातूर परीसरातील प्राचीन इतिहासाला आणखी ऊजाळा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
इतिहासाचे साधन म्हणून लेणी अथवा लयन स्थापत्य म्हणजे डोंगर खोदून तयार केलेले विश्रामगृह होय. भारतात सुमारे १२०० लेणी आहेत तर महाराष्ट्रात सुमारे ९०० लेणी आहेत. लातूर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्टीने वारसा संपन्न आहे. येथे प्राचीन काळापासून या परिसरात अनेक राजवटी होवून गेल्या. लातूर जिल्ह्यातून बालाघाट डोंगर रांग गेली असून अनेक टेकड्या जिल्ह्यात विविध भागात आढळतात, अश्या ठिकाणी प्राचीन काळी लेणी निर्माण केलेल्या आहेत.
लातूर जिल्ह्यात खरोसा, कळमगाव, हसेगाववाड़ी, हत्तीबेट, लोहारा येथे लेणी आहेत.
नुकतेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील प्रा. डॉ. माधवी महाके आणि पानगांव येथील इतिहास संशोधक आणि शिलालेख अभ्यासक कृ्ष्णा गुडदे यांनी चाकूर तालुक्यातील जानवळ येथील बेटावरील लेणींचे संशोधन केले आहे. संशाधनातून जानवळ गावच्या दक्षिण बाजूस असलेल्या टेकडीवर दोन लेणी खोदलेल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ टेकडीनंतरची अत्यंत दुर्गम आणि वनव्याप्त असलेली जानवळ टेकडी ही उंच टेकडी आहे. त्या जागी टेकडीच्या उत्तर दिशेला दोन्हीही लेण्या असून सध्या त्या भग्नावस्थेत आहेत.
तरीही त्यांचे स्थापत्य महत्वपूर्ण आहे. लेणी क्रमांक एक अत्यंत लहान असून त्या लेणीच्या वरच्या काताळ कड्यावर वर २२ कपमार्क्स असल्याची माहिती संशोधकांना प्राप्त झाली आहे. कपमार्क्स म्हणजे कप अथवा उखळाच्या आकाराचा मानवनिर्मित खळगा होय.
प्राचीन काळापासून जगभर हे कपमार्क्स आढळून येतात. या कपमार्कवर अनेक देशात संशोधन सुरु आहे. जानवळ, लोहारा येथील लेणीवर हे कपमार्क्स असून जानवळ येथे कपमार्क्सची संख्या २४ आहे.
हा अत्यंत महत्वपूर्ण पुरावा असून जानवळ लेणी ही लेण्या स्थापत्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या संशोधनात प्रा. डॉ. महाके व कृष्णा गुडदे यांना जानवळ गावातील ग्रामस्थ, लेणी लगत शेत असलेले ज्ञानोबा पवार, दुर्मिळ वनस्पती संवर्धक शिवशंकर चापुले यांचे सहकार्य लाभले.
या संशोधनाबद्दल इतिहास आणि पुरातत्व विषयात आवड असलेले जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी हे संशोधन अत्यंत मुलगामी असून या संशोधनातून जिल्ह्याच्या समृद्ध परंपरेत भर पडल्याचे सांगितले.