मुंबई : ठाण्यातील साकेत ग्राऊंड येथे व्यायाम करताना एका तरुण पोलीस शिपायाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. महेश मोरे असं मृत्यू झालेल्या शिपायाचं नाव असून तो अवघ्या २७ वर्षांचा होता. चालता चालता हा तरुण जमीनीवर कोसळला आणि रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच त्याने प्राण सोडले.
महेश मोरे हा ठाणे पोलिसांच्या शीघ्र कृती दलात कार्यरत होता. गुरूवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो साकेत येथील पोलीस मैदानात मॉर्निंग वॉकसाठी गेला होता.
चालत असताना अचानक त्याच्या छातीत कळ येऊन तो खाली कोसळला. तेथे उपस्थित असणाऱ्यांनी त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले.
परंतु रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वी वाटेतच महेशचा मृत्यू झाला. रुग्णालयामध्ये त्याला मयत अवस्थेत आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
महेशच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.