धाराशिव : भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य बसवराज मंगरुळे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील साडेचारशेहून अधिक गावांना त्यांनी गेल्या काही महिन्यांत भेटी देऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असून जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे बसवराज मंगरुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
धाराशिव शहर मेळाव्याच्या सभागृहात मंगळवारी दि. 3 ऑक्टोबर रोजी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य खंडेराव चौरे उपस्थित होते. पुढे बोलताना मंगरुळे म्हणाले की, मी 1997 पासून म्हणजेच गेली 26 वर्षे भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. जिल्हा खजिनदार ते भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षापर्यंत काम करून संघटनेत योगदान दिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाने आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम येथील रहिवासी असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताना येथे अनेक गोष्टी पाहायला मिळतात. कृषी व्यवसायात रोजगार निर्मितीची मोठी संधी आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक नेत्यांसमवेत पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडली आहे. स्थानिक स्वराज संस्था ते लोकसभा निवडणुकीत सक्रीय राहिले आहेत.
येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून तरुणांना रोजगार देण्यास मोठा वाव आहे. पक्षाने संधी दिल्यास धाराशिव लोकसभा लढविण्यास इच्छुक असून मतदारसंघातील नागरिकांच्या जीवनात सोनेरी दिवस आणण्याचे काम करणार असल्याचे मंगरुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.